

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे। अमळनेर तालुक्यासाठी २७ ऑगस्टचा दिवस काळा ठरला. अवघ्या काही तासांच्या अंतरात घडलेल्या दोन हृदयद्रावक घटनांमध्ये तब्बल ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुका सुन्न झाला आहे. एका घटनेत टाकरखेडा येथील पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवले, तर दुसऱ्या घटनेत खौशी येथे तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचवताना वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाला. एकाने बुधवारी सायंकाळी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली असून त्याची ओळख पटली नसल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, टाकरखेडा येथे सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्या दोन मुलांसह पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडत रेल्वेखाली जीवन संपवले. त्यांच्यासोबत असलेले सनी आणि राज या दोन चिमुकल्यांचाही या घटनेत मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. घटनेचा तपास सुरू आहे.
बाप लेकाचा तलावात बुडून मृत्यू
दरम्यान, खौशी येथेही नियतीने एका कुटुंबावर घाला घातला. तलावात मुलगा बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अण्णा एकनाथ तलवारे आणि वीरेंद्र अण्णा तलवारे अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, तलावातील गाळात मुलगा अडकल्याचे वडिलांच्या लक्षात आले. मुलाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात धाव घेतली. मात्र, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तेही गाळात अडकल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले.
रेल्वेखाली झोकून देत तरुणाने संपवले जीवन
बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास टाकरखेडा ते अमळनेर दरम्यान रेल्वे रुळावर झोकून देत खानदेश एक्सप्रेसखाली स्वतःचे जीवन संपवले. यासंदर्भात अद्याप कोणतीही सविस्तर माहिती मिळालेली नसून तरुणाची ओळख पटली नसल्याचे समजते.
एकाच दिवशी सहा जीव गेले; अमळनेर तालुका हादरला
एकीकडे टाकरखेड्यातील एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने काळीज पिळवटून निघाले असतानाच, दुसरीकडे खौशी येथे मुलाला वाचवताना वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याने दुःख आणखी गडद झाले आहे. अवघ्या एका दिवसात अमळनेर तालुक्यात सहा जणांचा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दोन्ही घटनांनी अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावागावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.







