ब्रेकिंग : साहेब पायी फिरायला निघाले आणि १७ लाखांचा गांजा पकडून आले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत, मोरव्हाल, ता.रावेर शिवारातील दोन एकर शेतीत लपवून केलेली सुमारे १७१ किलो वजनाची गांजाची (कॅनबिस वनस्पती) लागवड उद्ध्वस्त केली आहे. जप्त केलेल्या गांजाचे बाजारमूल्य अंदाजे १७ लाख रुपये इतके आहे. या प्रकरणी एका आरोपीवर एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल हे दि.८ रोजी गावात पायी गस्तीसाठी निघाले असताना त्यांना दोन
तरुण संशयितरित्या बसलेले आढळून आले. दोघांना पोलीस ठाण्यात घेऊन जात विचारपूस केली असता एकाच्या मोबाईलमध्ये गांजाची शेती असलेले फोटो दिसून आले.
अधिक तपास केला असता मोरव्हाल येथील युसुफ अकबर तडवी (वय ५०) या याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार आणि फॉरेन्सिक पथकाने सकाळी शेतात छापा टाकला.
३ किमीचा परिसर पिंजून काढला
शेत हे अति दुर्गम भागात असल्याने गुन्हे शोध पथकाला कारवाईसाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. पथकाने सकाळी ८ वाजल्यापासून जवळपास ३ किलोमीटरचा परिसर पिंजून काढत मिळालेल्या बातमीची खातरजमा केली आणि त्यानंतर ही यशस्वी कारवाई पूर्ण केली. युसुफ तडवी याने आपल्या दोन एकर शेतीत तुरीच्या पिकाच्या मधोमध गांजाची लागवड केली होती.
तुरीच्या पिकात लपवली होती गांजाची झाडे
आरोपी युसुफ तडवी याने आपल्या दोन एकर शेतीत तुरीच्या पिकाच्या मधोमध स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारी कॅनबिस वनस्पती (गांजा) सदृश अंमली पदार्थाची लागवड केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीत एकूण १७१ किलो वजनाची १७२ लहान-मोठी गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, पोउपनिरी तुषार पाटील, पोउपनिरी मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील पोना कल्पेश आमोदकर, पोकाँ प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील, पाल दुरक्षेत्रचे पोहेकाँ ईश्वर चव्हाण, पोहेकाँ जगदीश पाटील, पोकाँ ईस्माईल तडवी, पोकाँ गजाजन बोणे, कुंदन नागमल आणि चालक पोहेकाँ गोपाळ पाटील यांच्या पथकाने केली आहे.






