अपघात : दुचाकी घसरली, धडकेत पादचारी जैन मुनी जखमी
महा पोलीस न्यूज । दि.५ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील महामार्गावर मानराज पार्कजवळ दुचाकी घसरून अपघात झाला. दुचाकीची धडक बसल्याने पादचारी जैन मुनी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. अपघातात दुचाकीस्वार मुख्याध्यापक देखील जखमी झाले आहेत. दोघांवर उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी पार्क परिसरात राहणारे ईश्वर पाटील हे मेहरुण परिसरातील एका शाळेत मुख्याध्यापक आहेत. गुरुवारी सकाळी ते दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीजी.५७६२ ने शहराकडे जात होते. मानराज पार्कजवळ साईड पट्टीवरून त्यांची दुचाकी घसरल्याने त्यांचा तोल गेला. दुचाकी पायी चालत असलेले जैन मुनी भुषण मुनी यांना धडकली.
अपघातात ईश्वर पाटील आणि भुषण मुनी दोघे जखमी झाले असून एड.कुणाल पवार आणि नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारार्थ जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक अमर जैन यांच्यासह जैन समाजातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. महामार्गाच्या साईडपट्ट्या खोल गेल्या असून महामार्ग प्राधिकरणाला त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येते.