ब्रेकिंग : वाळुच्या डंपरने घेतला माय-लेकाचा बळी, पुलावरून कोसळली कार, बापासह चिमुकला गंभीर!
विदगाव पुलावर अपघात, डंपर आडवे झाल्याने वाहतूक ठप्प, दोघे गंभीर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांचा हैदोस काही कमी होत नसून विदगावच्यापुढे पुलावर जळगावकडून यावलकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने जळगावकडे येत असलेल्या चारचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भयानक होता की चारचाकी थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. अपघातात एक मुलासह आई ठार झाले असून वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणारे निलेश प्रभाकर चौधरी वय-४५ हे धानोरा येथील शाळेत शिक्षक असून पत्नी मीनाक्षी वय-४० या जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील पाटणकर शाळेत शिक्षिका आहेत. दोघे मुलगा पार्थ वय-१२ आणि ध्रुव वय-६ यांच्यासह चारचाकी कार क्रमांक एमएच.१९.डीव्ही.८०३२ ने चोपडा येथे नातेवाईकाकडे अष्टमीच्या पूजेसाठी गेले होते.
भरधाव डंपरने उडवले, कार पुलावरून कोसळली
रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगावकडे परतत असताना जळगावहून भरधाव वेगाने चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूच्या भरलेल्या डंपरने समोरून त्यांच्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की चारचाकी पुलाचा कठडा तोडून खाली नदीच्या काठावर खडकाळ भागात कोसळली. डंपरची पुढील दोन्ही चाके निखळली तर डंपर पुलावर आडवा होऊन सर्व वाळू पसरली.
दोघे ठार.. जळगाव, चोपड्यात शोककळा
अपघातात कारचा चक्काचूर झाला असून सर्व एअर बॅग देखील उघडल्या. अपघातात कारमधील मीनाक्षी चौधरी वय-४० व मोठा मुलगा पार्थ वय-१२ हे दोघे जागीच ठार झाले तर निलेश प्रभाकर चौधरी वय-४५ आणि लहान मुलगा ध्रुव वय-६ हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच नातेवाईक आणि मित्र परिवाराने धाव घेतली.
पुलाच्या दुतर्फा वाहतूक ठप्प
अपघातात वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चोपड्याकडून जळगावकडे येणारी तसेच जळगावहून चोपड्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने डंपर बाजुला करण्याचे काम सुरू आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






