अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ देऊन गौरव
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि मिरा-भाईंदर, वसई-विरार, पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त असलेले दत्तात्रय तुळशीदास शिंदे, भा.पो.से. यांचा भारतीय स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती यांच्याकडून “गुणवत्तापूर्ण सेवा पदक” देऊन गौरव करण्यात आला. पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
दत्तात्रय तुळशीदास शिंदे हे सध्या अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई- विरार, पोलीस आयुक्तालय या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, गोंदिया, सोलापूर शहर, नवी मुंबई मुंबई, सिंधुदुर्ग, सांगली, नागपुर, जळगाव, पालघर, ठाणे शहर याठिकाणी विविध पदावर काम केलेले आहे. त्यांचे मूळगाव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिंचोली हे आहे. आज दिनांक १४ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींनी महाराष्ट्र पोलीस दलातील एकुण ३९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल “राष्ट्रपती पदक” देऊन गौरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचा व संदीप दिवाण, पोलीस उप महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई या दोन वरिष्ठ आय.पी.एस. अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शेतकरी कुटुंबातील अधिकारी
अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे हे ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी एम.एस.सी. (कृषी), जी.डी.सी. अॅन्ड ए., डी.सी.ए., एल.एल.बी. हे शिक्षण पूर्ण केलेले आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध पदावर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
१९९६ पासून दत्तात्रय शिंदे यांची सेवेला सुरुवात
दि.०२/१२/१९९६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उप अधीक्षक या पदावर त्यांची निवड झाली. सन १९९७ मध्ये परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक म्हणून गडचिरोली जिल्ह्यात नेमणूकीस होत. सन १९९९-२००१ या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदीया पदावर कामकाज पाहिले. गडचिरोली व गोंदीया येथील सेवाकालावधीमध्ये त्यांनी अत्यंत परिणामकारक नक्षलविरोधी अभियाने उत्कृष्टपणे राबविली. एरिया डॉमिनेशन, अॅम्बुश इत्यादी नक्षलविरोधी अभियाने राबविली. नक्षलग्रस्त भागामध्ये साडेतीन वर्षासाठी केलेल्या कठीण कर्तव्याकरीता त्यांना महाराष्ट्र शासनाने “विशेष सेवा पदक” देवून गौरविलेले आहे. तसेच या कर्तव्य काळासाठी केंद्र शासनाचे “आंतरीक सुरक्षा पदक” त्यांना प्राप्त आहे. या काळात नक्षलदलाविरुध्द दाखल विविध गंभीर गुन्ह्यांचा टेररिस्ट अॅन्ड डिसरप्टीव्ह अॅक्टीव्हीटस प्रिव्हेंशन अॅक्ट (टाडा/TADA) या कायद्यांतर्गत तपास केला आहे.
सक्रिय नक्षलवाद्याला केली होती अटक
नक्षल विरोधी अभियाना दरम्यान नक्षलदलाच्या मल्लेश या सक्रिय नक्षलवाद्यास अटक झाल्यानंतर व उपकमांडर विक्रम याचा शोध घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर सन २००१-२००४ या कालावधीत सहायक पोलीस आयुक्त, विभाग-२ व सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, सोलापुर पदावर त्यांनी कामकाज पाहिले. सोलापूर शहर येथे कार्यरत असतांना सन २००३ मध्ये फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत अचुक गुन्हेगारी गुप्त गुन्हेगारी गुप्त वार्ता प्राप्त करुन १२६ हातबॉम्ब जप्त करण्यात आले. या दोन गुन्ह्यांचा प्रिव्हेन्शन ऑफ टेरेरीस्ट अॅक्टीव्हीटीज अॅक्ट (पोटा / POTA) कायद्याअंतर्गत तपास करुन गुन्हेगारांविरुध्द दोषारोपपत्र सादर करण्यात आली. याशिवाय दि.११/१०/२००२ रोजी सोलापूर शहरामध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये बेकायदेशिर जमावास पांगविण्यासाठी बळाचा परिणामकारक वापर केला. जिवितांचे व सार्वजनिक मालमतेचे संरक्षण करण्यासाठी वेळप्रसंगी गोळीबार करावा लागला, तसेच शास्त्रीनगर भागात कॉम्बींग ऑपरेशन राबवून सुमारे घातक शस्त्रास्त्रे जप्त करुन आरोपींना अटक केली. दंगलीमध्ये आरोपींना अटकाव करणे, अटक करणे व त्यानंतर त्यांचेवर न्यायालयीन खटले भरणे या कामगिरींमध्ये महत्वाची भूमिका बजावली.
मोठ्या दंगलींवर मिळवले नियंत्रण
शहरातील धोकादायक व्यक्तींना महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, औषधी द्रव्ये विषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले, वाळू तस्कर व धोकादायक व्यक्ती यांच्या घातक कारवायांवर प्रतिबंध अधिनियम (Maharashtra Prevention of Dangerous Activities of slumlords, Drug offenders Bootleggers, Sand smugglers & Dangerous Persons Act (MPDA) कायद्याअंतर्गत स्थानबध्द (Detention) केले. सन २००४ ते २००६ या कालावधीमध्ये सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई या पदावर कामकाज पाहिले. नवी मुंबई शहरातील संघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पाहिले. तसेचा सन २००६ मध्ये घनसोली येथे उसळलेल्या दंगली दरम्यान आरोपींवर परिणामकारक बळाचा वापर करून दंगल नियंत्रणात आणली. यावेळी गोळीबार करुन जिवीतांचे व सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण केले.
गुंडांच्या झालेल्या चकमकीत १३ गुंड ठार
सन २००६ मध्ये पदोन्नतीवर पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस अधीक्षक/ पोलीस उप आयुक्त या पदावर नेमणूक झाली. सन २००६ ते २००९ या कालावधीत पोलीस उप आयुक्त, (प्रकटीकरण-१), गुन्हे शाखा, मुंबई या पदावर कामकाज पाहिले. येथे कार्यरत असतांना मुंबई उपनगर परिसरात संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाईवर नियंत्रण ठेवले. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई केली. तसेच या कालावधीत त्यांचे अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यासोबत संघटीत टोळ्यामधील गुंडांच्या झालेल्या चकमकीत १३ गुंड ठार झाले. सन २००९ ते २०१२ या काळात पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा), नवी मुंबई या पदावर कार्यरत असतांना नवी मुंबई आयुक्तालयामध्ये गुन्हे नियंत्रण करणे, बीट मार्शल सिस्टम कार्यरत करणे, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारणे याबाबत कार्यवाही केली. तसेच संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई केली.
गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल अनेक पदकांनी गौरव
सन २०१४ मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी श्री. दत्तात्रय शिंदे यांच्या गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल “मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह” प्रदान करुन त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव केला. सन २०१२ ते २०१५ काळात पोलीस अधीक्षक, फोर्स वन, मुंबई येथे कार्यरत असताना फोर्स वनच्या अभियान क्षमता वाढविण्यासाठी कामकाज पाहिले. दहशतवाद विरोधी अभियान क्षमता वाढविण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) येथे प्रशिक्षण घेतले. आखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा (ALL INDIA POLICE COMANDO COMPETITION) मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम केले व महाराष्ट्र पोलीस दलाला उपविजेते (Silver Medal) पद मिळाले, फोर्सचन या विशेष बलामध्ये तीन वर्षाकरीता उत्कृष्ठ सेवा बजावल्याबाबत २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचे “फोर्स वन विशेष सेवा पदक” प्रदान करुन गौरविण्यात आले.
गुन्हेगारांसह संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई
दि.२०/०५/२०१५ ते १०/०६/२०१६ या कालावधीत पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग या पदावर कार्यरत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रियाशिल झालेल्या घरफोडी करणाया परराज्यातील टोळीबाचत तपास करुन बघोली, ता.कुक्षी, जिल्हा धार, राज्य मध्यप्रदेश येथून आरोपींना अटक करण्यात आली. दि.१७/१०/२०१५ पासुन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये “श्रमदानातून स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. श्रमप्रतिष्ठ वाढविणे व सामाजिक समतेचा प्रसार व्हावा यासाठी सदरचे अभियान सुरु केले होते. या अभियानामध्ये पोलीस मित्र, सागर रक्षक दल व स्थानिक स्वराज्य संस्था यांचे उत्कृष्ट सहकार्य मिळाले. त्यामुळे पोलीस कार्यालय व पोलीस वसाहती शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेले महत्वाचे सागर किनारे स्वच्छ करण्यात आले. दि.१३/०६/२०१६ ते २३/११/२०१७ या कालावधीत पोलीस अधीक्षक, सांगली पदावर कार्यरत असताना त्यांनी एकूण १२ धोकादायक व्यक्तीस एम.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबध्द करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्याच सोबत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्याखाली ४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करुन २७ गुंडांच्या विरुध्द कारवाई केली होती. संघटीत मटका जुगार हा गुन्हा करणाऱ्या २१ टोळ्यांविरुध्द मुंबई पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीची कारवाई करुन एकूण १९२ मटका गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले. उत्सवाचे काळात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डॉल्बीच्या विरोधी समाज प्रबोधन करुन कायदेशिर कारवाई केली.
डॉल्बीमुक्तीतुन जलयुक्तकडे योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
“डॉल्बीमुक्तीतुन जलयुक्तकडे” ही योजना प्रभावीपणे राबवून उत्सव मंडळांनी दिलेल्या लोक सहभागातून मिरज तालुक्यामध्ये “सुखकर्ता” व “विघ्नहर्ता” बंधाऱ्यांचे बांधकाम केले. xi) दि.०४/१२/२०१७ ते २८/०७/२०१८ पर्यंत समादेशक, राज्य राखीव क्र.४ नागपुर येथे कार्यरत असतांना “राज्य आपत्ती प्रतिसाद दल” (State Disaster Response Force, SDRF) नागपुर या नविन दलाच्या उभारणीचे काम केले. या दलासाठी आवश्यक उपकरणे खरेदी व प्रशिक्षणावर भर देवून कोणत्याही आपत्तीला समक्षपणे प्रतिसाद देण्याकनीता या दलाची क्षमता निर्माण केली. xii) दि.०३/०८/२०१८ ते २८/०२/२०१९ या कालावधीत पोलीस अधीक्षक जळगांव पदावर कामकाज पाहिले, जळगांव जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोहिम राबविली. भुसावळ शहरामध्ये अतिक्रमण विरोधी मोहिम राबवून ६ चौ.कि.मी. रेल्वे परिसरातील सुमारे ५००० अतिक्रमणे कोणताही अनुचित प्रकार घडू न देता काढली. जळगांव शहरातील अतिक्रमण निर्मूलन केले.
महावितरणमध्ये सुरक्षा व अंमलबजावणी या पदावर परिणामकारक कामगिरी
दि.०८/०३/२०१९ ते २३/०५/२०२० या कालवधीत महावितरण विभागात कार्यकारी संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी या पदावर परिणामकारक कामगिरी केली. दि.२३/०५/२०२० ते ०१/०६/२०२२ कालावधीत पोलीस अधीक्षक, पालघर या पदावर काम करताना ४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्याअंतर्गत कारवाई केली. साधु हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलीस जनता संपर्क वाढवून पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण केला. दि.१०/०६/२०२२ ते १०/०७/२०२४ या कालावधीत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, ठाणे शहर या पदावर कार्यरत असतांना त्यांनी एकूण २० धोकादायक व्यक्तींना ए.पी.डी.ए. कायद्याखाली स्थानबध्द करण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. त्याच सोबत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का/MCOCA) कायद्याखालील कलमांचा ४३ गुन्ह्यांमध्ये अंतर्भाव करण्याची पुर्वमंजुरी दिली. या गुन्ह्यांपैकी एकुण ३४ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले असुन त्यामध्ये एकुण २५ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील १३१ संघटीत गुन्हेगारांविरुश्द कारवाई केली आहे. त्यामुळे चैन स्नॅचिंग या गंभीर गुन्हे करणाया संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर संपूर्ण नियंत्रण मिळवता आले.
पोलीस विभागात विविध क्षेत्रामध्ये व शाखामध्ये प्रभावी काम
दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस विभागात विविध क्षेत्रामध्ये व शाखामध्ये प्रभावी काम केले आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षलविरोधी अभियाने राबवणे, मुंबई शहरामधील गुन्हे शाखेत काम करुन मुंबईतील संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवणे व फोर्स वन सारख्या विशेष बलामध्ये प्रशिक्षण घेऊन शहरी दहशतवाद विरोधी अभियाने (अर्बन काऊंटर टेरेरिझम ऑपरेशन) या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, सांगली, जळगांव, पालघर व अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण ठाणे शहर या पदावर कार्यरत असतांना एम.पी.डी.ए. व मोक्का/MCOCA वा विशेष कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. मटका व संघटीत गुन्हेगारी टोळ्यांवर तडीपारीची कारवाई खंबीरपणे केलेली आहे. तसेच ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी “डॉल्बीमुक्तीतुन जलयुक्तकडे” महिला सुरक्षेकरीता “निर्भया सायकल रॅली” आयोजन, महिला सुरक्षेकरीता “निर्भया पथकाची निर्मीती” ह्या नाविन्यपूर्ण व लोकसहभागाच्या योजना राबविल्या आहेत. पोलीस दलासाठी आव्हानात्मक असलेल्या सर्व विभागामध्ये व विशेष दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.