अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पिळोदे येथील कुटुंबीयांचे २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण

अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पिळोदे येथील कुटुंबीयांचे २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण
पिळोदे ता. अमळनेर प्रतिनिधी: गावाच्या इतिहासात प्रथमच, अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पिळोदे येथील एक कुटुंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी हे उपोषण सुरू होणार आहे.
सदर कुटुंब घरातील कर्ता पुरुष कर्तव्यावर असताना मयत झाले व त्यांचा जागी अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर समाविष्ट करण्यात साठी अनेक वर्षा पासून अर्ज करत आहेत, परंतु त्यांच्या अर्जावर कोणताही विचार केला जात नाही, असा त्यांचा दावा आहे. याबाबत बोलताना, अर्जदाराने ग्रामपंचायतवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “मी त्यावेळी कामासाठी नकार दिला होता, असे ग्रामपंचायत म्हणते. जर मी नकार दिला असता, तर मी पुन्हा पुन्हा अर्ज का केले असते?” असा सवाल त्यांनी विचारला.
त्यांच्या आरोपानुसार, परिस्थितीची जाणीव असूनही ग्रामपंचायतने त्यांच्या वडिलांच्या जागी भिला बापूराव संदानशिव या व्यक्तीला काम दिले आणि तसा ठरावही मंजूर केला. शिपाई पद रिक्त असतानाही त्यांच्या अर्जाचा विचार का झाला नाही, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव आणि गट विकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांच्याकडून आलेल्या नोटीसकडेही ग्रामपंचायतने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, गेल्या चार-पाच महिन्यांपासून एक अनोळखी व्यक्ती भूतपूर्व शिपाई म्हणून कार्यालयीन कामे करत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या सर्व प्रकारच्या दुजाभाव आणि अन्यायमुळेच नाइलाजाने उपोषणासारख्या कठोर मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अर्जदार आणि त्यांच्या आईने ग्रामपंचायत कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे. जर या निवेदनावर योग्य कार्यवाही झाली नाही, तर महात्मा गांधी जयंती दिनी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी, हे कुटुंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.






