ग्रामीण रुग्णालयात ‘भुताटकी हजेरी’ प्रकरण, ग्रामस्थांचा संताप; चौकशीची मागणी

अमळनेर| पंकज शेटे – अमळगाव (ता. अमळनेर) येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येथे नियुक्त असलेले काही कंत्राटी डॉक्टर आठवड्यातून फक्त एकदाच येऊन, संपूर्ण आठवड्याची हजेरी एकाच दिवशी नोंदवून जातात, असा आरोप ग्रामस्थ भूषण सुरेश चौधरी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
ग्रामस्थ भूषण सुरेश चौधरी यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अमळगाव ग्रामीण रुग्णालयात एकूण चार कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी फक्त डॉ. योगेश वसंत वाणी हे नियमितपणे सेवा देत आहेत. मात्र, उर्वरित तीन डॉक्टर केवळ आठवड्यातून एकदा येतात आणि त्याच दिवशी संपूर्ण आठवड्याच्या हजेरीवर सह्या करून निघून जातात. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बायोमेट्रिक असूनही नियमांचे उल्लंघन
शासनाने सर्व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली असतानाही, या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. बायोमेट्रिक हजेरीचा वापर न करताच या डॉक्टरांना वेतन दिले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे सरकारचे लाखो रुपये वेतनाच्या नावाखाली वाया जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रुग्णांच्या हक्कांवर अन्याय
दुपारनंतर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हा रुग्णांच्या मूलभूत हक्कांवर अन्याय असल्याचा गंभीर प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या –
दोषी डॉक्टरांची तातडीने चौकशी करून त्यांच्याकडून मागील दोन वर्षांचे वेतन वसूल करावे.
अमळगाव ग्रामीण रुग्णालयात २४ तास वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतील अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आता आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





