अमळगावला १५ दिवसांच्या उपासानंतर विजांचा संग्राम – शेवटी पावसाने दिली उजळणारी आशा

अमळनेर|पंकज शेटे : (१६ ऑगस्ट २०२५) – अखेर १५ दिवसांच्या कोरड्या खंडानंतर अमळगाव व परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. १५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजल्यानंतर पावसाच्या सरांनी शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
मका, कापूस, मूग, सोयाबीन यांसारखी पिके तग धरून होती. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी झगडणाऱ्या या पिकांना आता जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.
३० जुलैपर्यंत अमळनेर तालुक्यात फक्त २५.९२ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते. मात्र या पावसामुळे आता खरीप हंगामाबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे.
प्रगतशील शेतकरी विजय कृष्णा मोरे (अमळगाव) म्हणाले, “हा पाऊस आमच्यासाठी वरदान ठरला आहे. मका आणि मूग तर आटत चालले होते, पण आता जमिनीतली ओल वाढल्यामुळे पिकांना नवा जीव मिळेल. पुढचे ८-१० दिवस जर पावसाची साथ मिळाली तर हंगाम नक्कीच चांगला जाईल.”
पावसामुळे अमळगाव येथील चिखली नदीला पाणी आले असून ओढे-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गावात हिरवाई परतताना दिसत असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पुन्हा एकदा उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.






