Other

ब्रेकींग : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरसाठी लाच, २ पोलिसासह पंटर जाळ्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । एका व्यक्तीकडून १५ हजाराची लाच मागून तडजोडीअंती १२ हजार स्वीकारल्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एका खाजगी इसमावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २४ रोजी करण्यात आली. अवैध गॅस रिफिलिंग सेंटरसाठी लाच मागितल्याने ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील (वय ३६) आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे (वय ३३) यांनी तक्रारदाराकडे दरमहा ₹१५,००० चा हप्ता मागितला. हा हप्ता न दिल्यास अवैधरित्या गॅस भरल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी त्यांनी दिली. या संदर्भात तक्रारदाराने २३ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचखोरांनी ₹१५,००० ची मागणी करून तडजोडीअंती ₹१२,००० स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे समोर आले.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दिनांक २४ सप्टेंबर रोजी, एसीबीच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यादरम्यान आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी आरोपी क्रमांक ३, उमेश भटु बारी (वय ४६), या खाजगी इसमाच्या हस्ते तक्रारदाराकडून ₹१२,००० ची लाच स्वीकारली. अमळनेर येथील बहादरपुर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मीनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वराज्य पानाचे दुकानात ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथील पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल आणि यशवंत बोरसे, तसेच पोलीस अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, आणि जगदीश बडगुजर यांचा समावेश होता.

एसीबीने केले आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय किंवा निम-शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा खाजगी व्यक्ती यांनी काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास त्यांनी तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.

संपर्क माहिती :
* टोल-फ्री क्रमांक: १०६४
* दूरध्वनी: ०२५६२-२३४०२०
* ई-मेल: dyspacbdhule@gmail.com
* वेबसाइट: acbmaharashtra.gov.in

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button