रबरी शिक्के देण्यासाठी आलेल्या वृद्धाचा हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

रबरी शिक्के देण्यासाठी आलेल्या वृद्धाचा हॉटेलमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
जळगाव: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथील ७० वर्षीय मोहम्मद शफी मोहम्मद मोमीन यांचा मृतदेह २ मे रोजी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाजवळील एका हॉटेलच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळला.
या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, जिल्हापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.मोहम्मद शफी हे रबरी शिक्के बनवण्याचा व्यवसाय करत होते. २८ एप्रिल रोजी ते जळगाव जिल्हा न्यायालयात शिक्के देण्यासाठी आले होते.
मात्र, त्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवली होती. शुक्रवारी हॉटेलच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी तपासणी केली असता मृतदेह आढळला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. ओळख पटल्यानंतर मुलाने शोक व्यक्त केला. मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. जिल्हापेठ पोलिस तपास करत असून, मृत्यूमागील कारणांचा शोध घेत आहेत.