Politics

पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम तर उपाध्यक्षपदी राहुल काकडे यांची बिनविरोध निवड

पणन महासंघाच्या अध्यक्षपदी रोहित निकम तर उपाध्यक्षपदी राहुल काकडे यांची बिनविरोध निवड

मुंबई/जळगाव : खानदेशातील शेतकरी कुटुंबातून आलेले युवा सहकार नेते रोहित दिलीपराव निकम यांची महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (पणन महासंघ) या राज्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या शिखर संस्थेच्या अध्यक्षपदी, तर राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

विशेष म्हणजे, गेल्या सुमारे ७० वर्षांनंतर प्रथमच या महत्त्वाच्या सहकारी संस्थेचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाशी संबंधित नेतृत्वाकडे आले असून, राज्याच्या सहकार क्षेत्रात या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात गुरुवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सह निबंधक, सहकारी संस्था मुंबई शाहजी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रक्रियेत रोहित निकम यांची अध्यक्षपदी आणि राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना रोहित निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री जयकुमार रावल, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच मंत्री संजय सावकारे यांचे आभार मानले.

यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्यावर दाखविण्यात आलेला विश्वास सार्थ ठरवत शेतकरी हित, सहकार क्षेत्राची मजबुती आणि पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार आहे. ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी पणन महासंघाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न राहील.

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ही राज्यातील खरेदी-विक्री संघ, कृषी पणन व प्रक्रिया सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. कृषी उत्पादनांचे विपणन, साठवणूक, खरेदी-विक्री तसेच शेतकरी हिताच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत महासंघाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी ही केवळ प्रशासकीय नसून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या हिताशी निगडित मानली जाते.
शेतकरी कुटुंबातून आलेले रोहित निकम यांनी आजोबा बॅरिस्टर देवराव निकम आणि वडिलांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेत विविध संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक असून जळगाव जिल्हा कृषी उद्योग व सर्व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच भाजप सहकार आघाडी, महाराष्ट्र राज्यचे सहसंयोजक म्हणूनही ते कार्यरत आहेत. सहकार, कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचा अनुभव पणन महासंघाच्या कामकाजाला नवी गती देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवड प्रक्रियेवेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार जयंत पाटील, संचालक संजय पवार, अतुल गण्यारपवार, सुभाष रघातटे, रमेश हिंगणकर, नितीन हिवसे, सुनील चव्हाण, पांडुरंग घुगे, संदीप नरके, प्रमोद रावराणे, आबासाहेब पाटील, बळवंत पाटील, धनश्रीदेवी घाटगे, अयोध्या धस, अशोक हटकर, दत्तात्रय पानसरे यांच्यासह महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल कुलकर्णी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्यातील सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाचा उदय आणि शेतकरी-केंद्रित धोरणांना बळ देण्याच्या दृष्टीने रोहित निकम यांची अध्यक्षपदी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात असून, आगामी काळात पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अधिक प्रभावी योजना आणि उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button