धक्कादायक! वाटणीत जास्त हिस्सा मागितल्यामुळे पित्यानेच घेतला पुत्राचा जीव , भावाचाही सहभाग
दोघांना अटक ,भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथील घटना,

धक्कादायक! वाटणीत जास्त हिस्सा मागितल्यामुळे पित्यानेच घेतला पुत्राचा जीव , भावाचाही सहभाग
दोघांना अटक ,भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बाळद खुर्द गावात घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पित्यानेच आपल्या मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला असून, या अमानुष कृत्यात भावाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. मृत बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) याने घरच्या वाटणीत अधिक हिस्सा मागितल्याने वाद उद्भवला. हा वाद क्षणातच मारहाणीत रूपांतरित झाला. पित्याने राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भावाने भारत शिंदे (वय २२) यांनी बाळूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर आणि छातीवर जोरदार मारहाण करत त्याचा जीव घेतला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघा संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सुनिल लोटन पाटील (वय ५४, पोलीस पाटील, बाळद खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भडगाव पोलीस ठाण्यात भारत शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम १०३(१), ११५(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के आणि पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करीत आहेत.