एमआयडीसी पोलिसांची कामगिरी: चोरीस गेलेले ३३ मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी: चोरीस गेलेले ३३ मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आठवडे बाजारातून चोरीस गेलेले तब्बल ३३ मोबाईल फोन एमआयडीसी पोलिसांनी शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांकडून एकूण ३३ मोबाईल हस्तगत केले होते. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करून या सर्व मोबाईलचे मूळ मालक शोधले. त्यांच्याशी संपर्क साधून हे मोबाईल एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये परत करण्यात आले.
ही कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या यशस्वी तपास कार्यात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कार्यामुळे मोबाईल चोरी प्रकरणांवर नियंत्रण मिळविण्यात पोलीस यंत्रणेला मोठे यश मिळाले असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.






