
बनावट शेतकऱ्यांचे धाबे दणाणले, दलालांसह सहभागी कर्मचाऱ्यांवर ही कारवाईची मागणी…
महा पोलीस न्यूज अमळनेर (पंकज शेटे): तालुक्यात बनावट शेतकरी दाखले घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तहसीलदारांनी 14 जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. टप्प्याटप्प्यात सुनावण्या सुरु झाल्या आहेत.
अमळनेर तालुक्यात काही व्यापाऱ्यांनी शेतकरी दाखले मिळवण्यासाठी दलालांना हाताशी धरुन तालुक्यातील ग्रामीण भागातील उतारे शोधून ते संगणकाच्या साहाय्याने एडिट करुन त्यात व्यापाऱ्यांची नावे टाकण्यात आली. आणि हे उतारे प्रस्तावात जोडले जाऊन शेतकरी असल्याचे भासवून दलालांच्या माध्यमातून चिरीमिरी देऊन बनावट शेतकरी दाखले देण्यात आले आहेत. याच शेतकरी दाखल्यांच्या आधारे व्यापारी आणि बिल्डर यांनी शेतजमिनी खरेदी केल्या आहेत.
शेतकरी दाखल्याचा प्रस्ताव आल्यानंतर संबंधित मंडळाधिकाऱ्यांनी त्या उताऱ्याची ऑनलाईन खात्री करून प्रत्यक्ष पंचनामा करून तसा अहवाल सादर करायचा असतो. त्यांनतर संबंधित नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी या उताऱ्याची आणि मंडळाधिकाऱ्याच्या अहवालाची खात्री केल्यावरच शेतकरी दाखला द्यायचा असतो. मात्र कोणतीच खात्री न करता दाखले देण्यात आले आहेत. शेतकरी दाखल्यावर असणारा गट नंबर व्यापाऱ्याच्या नावावर आणि तो मूळ उतारा दुसऱ्याच्या नावावर असे अनेक प्रकरणे वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यावर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना पुरावे व कागदपत्रे देऊन चौकशीचे आदेश दिलेत. त्यानुसार तहसीलदार सुराणा यांनी दुय्यम निबंधकाकडून देखील बनावट दाखल्यांवर झालेल्या खरेदी व्यवहारांची माहिती काढून 14 जणांना नोटिसा दिल्या आहेत.
नोटिसा देताच काही बनावट शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या जमिनी मूळ मालकाच्या नावावर परत खरेदी करुन दिल्याचेही प्रकार झाले आहेत. दुय्यम निबंधकानी देखील खरेदी व्यवहार करताना उतारे तपासून आणि खात्री करुन व्यवहार मंजूर करणे आवश्यक असताना त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याचे उघडकीस आले आहे.
चार प्रकरणे कागदपत्रांसह तहसीलदारांकडे पाठवले आहेत आणि इतर प्रकरणाची देखील तपासणी करायला सांगितले आहे. बोगस खरेदी झाली असल्यास अशा जमिनी सरकार जमा करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. – नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळने