Detection Story : पायातील जोडवे, हातावर गोंदलेल्या नावाच्या आधारे पोलिसांनी केली खुनाच्या गुन्ह्याची उकल
शिरपुरच्या महिलेच्या खुनाचा गुन्हा पालघर पोलिसांकडून उघड : पोलिसांनी शोधल्या ४४५ ममता नावाच्या महिला
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राहणाऱ्या एका महिलेचे शीर धडावेगळे करून तिला मोखाडा पोलीस ठाणे हद्दीत खून करून फेकण्यात आले होते. अनोळखी महिलेच्या खुनाचा तपास करताना पालघर पोलिसांनी मयत महिलेच्या पायातील जोडवे आणि हातावर गोंदलेल्या ममता नावाच्या आधारे गुन्ह्याची उकल केली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना अथक परिश्रम करून महिनाभराच्या आत पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले आहे.
मोखाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारेगांवचे शिवारात खोडाळा ते कसारा जाणारे रोडवरील वैतरणा नदीवरील पुलाखाली दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अनोळखी स्त्री वय ३० ते ३५ वर्षे हीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन तीचे मुंडके कोणत्यातरी धारधार शस्त्राने धडा वेगळे करुन ते पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुलावरुन खाली टाकुन जिवे ठार मारल्याच्या उघड झाले होते. याप्रकरणी मोखाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२/२०२४ भा.दं. वि.सं. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज्यभरात पाठवली होती माहिती
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक, पंकज शिरसाट, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल विभुते, प्रभारी अधिकारी प्रदिप गिते यांना वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासाबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत-देसाई व उपनिरीक्षक रविंद्र वानखेडे यांचे पोलीस पथक तयार करण्यात आले होते. पथकाने मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, कल्याण, मुंबई तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पोलीस ठाणे यांचेशी संपर्क केला. परंतु मयत महिलेची कोणतीही माहिती प्राप्त झाली नव्हती.
हातावरील गोंदणमुळे शोधल्या ४४५ ममता नावाच्या महिला
मयत महिला हिचे उजव्या हातावर ममता असे नाव गोंदलेले होते तसेच पायामध्ये चांदीचे जोडवे त्यावर SDS असा मार्क होता. मयत महिलेल्या पायातील जोडव्याआधारे माहिती प्राप्त केली असता ते जोडवे हे शिरपुर जि.धुळे येथील SDS (सुधाकर दिपचंद सोनार) दिक्षा ज्वेलर्सचे मालक यांचेकडे तयार केल्याचे व ते पावरा समाजाचे महिला वापरत असल्याचे निष्पन्न झाले होते. माहितीच्या आधारे शिरपुर तालुक्यातील मतदार यादी तपासली असता सुमारे ४४५ ममता नाव असलेल्या महिला यांची यादी संकलीत केली. शिरपुर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची बैठक घेत त्यात सर्वांना गुन्हयातील हकिकत सांगीतली व त्या भागातील पोलीस पाटील यांचे वॉटसॲप ग्रुप तयार केले व त्यावर गुन्हयाची शोध पत्रीका पाठवुन त्वादवारे माहिती घेतली. मयत महिला ही मौजे लाकडे हनुमान ता. शिरपुर, जिल्हा धुळे येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते.
प्रेम संबंधातून केला खून
पोलिसांनी माहितीच्या अनुषंगाने अधिक माहिती प्राप्त केली असता यातील मयत व आरोपी सुनिल उर्फ गोविंद यादव यांचेत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुनिल उर्फ गोविंद यादव वय ४५ वर्षे रा. सोलापुर मुळ रा. खेंचा ता. जि. महाराज गंज राज्य उत्तरप्रदेश यास सोलापुर येथुन व आरोपी महेश रविंद्र बडगुजर उर्फ विक्की वय ३१ वर्षे रा. बोराडी ता. शिरपुर जिल्हा धुळे यास त्याचे राहते ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे कसून चौकशी केली असता मयत महिला सुनील यादव यास लग्न करण्यास व प्रॉपर्टी नावावर करून देण्यास बळजबरी करत होती. त्यावरून त्यांचेत वाद होऊन त्याने महेश बडगुजर याच्याशी संगनमत करून मयत हिस लोणावळा येथे फिरावयास जायचे आहे असे सांगुन तिला बोलाविले. महिलेला घेऊन इर्टिगा गाडीने पालघर जिल्ह्यातील मौजे कारेगावचे हद्दित आणून तिचा रुमालाने गळा आवळून जिवे ठार मारून तिचा खून करून तिचे मुंडके धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने वैतरणा नदीवरील पुलाखाली आणून टाकल्याचे आरोपीने कबुल केले आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक अनिल विभुते, मोखाडा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी प्रदिप गिते, उपनिरीक्षक स्वप्नील सावंत-देसाई, उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, हवालदार राकेश पाटील, कपिल नेमाडे, संजय धांगडा, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, नरेंद्र पाटील, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच सायबर शाखेतील हवालदार विशाल पाटील, वाल्मीक पाटील, रोहित तोरस्कर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.