माणुसकीचे दर्शन: तरुणाने परत केले २५ हजार रुपये; पोलिसांकडून प्रामाणिकपणाचा सन्मान!

अमळनेर(पंकज शेटे) : आजच्या धावपळीच्या आणि महागाईच्या युगात जिथे माणूस पैशांमागे धावत आहे, तिथे अमळनेरमध्ये माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. रस्त्यावर सापडलेले २५,००० रुपये एका प्रामाणिक नागरिकाने पोलिसांच्या स्वाधीन केले, ज्यामुळे एका गरजू व्यक्तीला त्याचे कष्टाचे पैसे परत मिळाले आहेत.
नेमकी घटना काय?
शहा आलम नगर येथील रहिवासी श्री. अब्दुल हनीफ शेख नथु यांना परिसरामध्ये २५,००० रुपये पडलेले मिळून आले. ही मोठी रक्कम असतानाही त्यांनी कोणताही मोह न धरता तातडीने पोलीस प्रशासनाशी व नगरसेवक नावेद शेख व गुलाम नबी यांना संपर्क साधला. त्यांनी ही रक्कम पोलीस स्टेशनला नेऊन पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली.
पोलिसांची तत्परता
पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने या पैशांच्या मूळ मालकाचा शोध सुरू केला. योग्य चौकशी आणि तांत्रिक पडताळणीअंती सदर पैसे हे इसामोद्दीन शेख यांचे असल्याचे निष्पन्न झाले.
मूळ मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू
आज पोलीस स्टेशनमध्ये इसामोद्दीन शेख यांना बोलावण्यात करण्यात आले. आपली खात्री पटल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी अब्दुल हनीफ शेख यांच्या उपस्थितीत ती रक्कम इसामोद्दीन यांच्या स्वाधीन केली. आपले हरवलेले पैसे परत मिळाल्याने त्यांनी अब्दुल हनीफ आणि पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले.
अब्दुल हनीफ शेख यांनी दाखवलेला प्रामाणिकता समाजासाठी आदर्श आहे. अशा सतर्क आणि प्रामाणिक नागरिकांमुळेच पोलिसांवरील आणि माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ होतो.” > — समाधान गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक)
>






