जळगावात क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या, दोघांना अटक, संपूर्ण फिर्याद वाचा..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जुन्या वादातून झालेल्या भांडणातून एका २६ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील दिक्षितवाडी परिसरात घडली. विशाल उर्फ विक्की रमेश बसवाल (मोची) (वय २६, रा.रामेश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीनुसार, शहरातील तुकारामवाडी येथे राहणारा आकाश जनार्दन मोची आणि त्याचा चुलत भाऊ विशाल बसवाल हे दोघे मित्र रोहीत भालेराव यांच्यासह त्यांच्या घरासमोर गप्पा मारत होते. त्यावेळी वीज गेल्यामुळे ते तिघे मोटारसायकलने एमएसईबी कार्यालयाकडे निघाले.
दिक्षितवाडीमधील एका जिमसमोरून जात असताना तिथे भूषण अहिरे, पवन बाविस्कर, आकाश ठाकूर आणि त्यांचे काही साथीदार वाढदिवस साजरा करत होते. त्यांनी आकाश आणि त्याच्या मित्रांना मोटारसायकलवरून जाताना पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. एमएसईबी कार्यालयाच्या गेटजवळ त्यांना गाठून त्यांनी विशालला खाली ओढले. त्यानंतर भूषण, पवन आणि आकाश यांनी त्यांच्याजवळील चाकूने विशालच्या मान, छाती आणि डोक्यावर वार केले.
जुन्या वादातून केला खून
हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेले आकाश आणि रोहीत त्यांना वाचवण्यासाठी धावले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले. आकाशने तात्काळ घरच्यांना फोन करून बोलावले. विशालला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक विशाल आणि त्याचा मित्र रोहित भालेराव यांच्यासोबत आरोपींचा पूर्वीपासून वाद होता. तसेच, मृत सूरज ओतारी यांच्याशी मैत्री असल्यामुळे आरोपींचा त्यांच्यावर राग होता, असे आकाश मोचीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी भेट दिली आहे.
दोघांना केली अटक
जिल्हापेठ पोलिसांनी याप्रकरणी भूषण मनोज अहिरे, पवन उर्फ बद्या दिलीप बाविस्कर, आकाश उर्फ खंड्या सुखलाल ठाकूर आणि इतर तीन ते चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गुन्ह्यात जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या पथकातील पो हे का मिलिंद सोनवणे, पो.का राहुल पाटील, पो.का समाधान पाटील, पो.का नरेंद्र दिवेकर, पो का प्रशांत सैंदाने, पो.का तेजस मराठे, पो.का गोविंदा साबळे, पो.का विशाल साळुंखे, पो का तुषार पाटील, पो.का जयेश मोरे यांनी आकाश सुकलाल ठाकुर उर्फ खंड्या आणि भूषण रमेश अहिरे रा.पिंप्राळा यांना अटक केली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






