भडगावात थरारक प्रकार : पतीने पत्नीला चिरडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

भडगावात थरारक प्रकार : पतीने पत्नीला चिरडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
भडगाव l विशेष प्रतिनिधी
भडगाव शहरातील पेठ भागात एका विवाहितेवर तिच्याच पतीने वाहनाद्वारे थेट जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. किरकोळ भांडणातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर टाटा नेक्सोन गाडी घालून, नंतर गाडी रिव्हर्स घेत तिला फरफटत नेले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या शरीरावर खोल जखमा व कातडी फाटण्याचे गंभीर परिणाम झाले आहेत.
ही घटना १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी तृप्ती रेवण पवार (वय ३२, रा. पेठ, भडगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा पती रेवण प्रमोद पवार (रा. पाचोरा) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने तृप्ती यांची बहिण प्रियदर्शनी हिला शिवीगाळ व मारहाण केली. पुढे मुलीला घेऊन जाण्याचा हट्ट धरत पत्नीच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत, आरोपीने टाटा नेक्सोन गाडी सुरू करून थेट पत्नीवर गाडी चढवली आणि परत मागे घेऊन फरफटत नेले.
ही घटना इतकी भयानक होती की, बघ्यांच्या अंगावर काटा आला. पीडित महिलेच्या शरीरावर खोल घाव झाले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी गु.र.नं. २२१/२०२५ नुसार IPC 2023 अंतर्गत कलम १०९, १९५८(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.