औष्णिक विद्युत केंद्रातून भंगार साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न
भुसावळ : दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या आवारातून लोखंडी भंगार साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न उघडकीला आला आहे. तर भंगार व दुचाकी सोडून दोन अनोळखी व्यक्ती पसार झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या आवारात पडलेले ४४ हजार ८०० रुपये किमतीचे भंगाराचे साहित्य अनोळखी दोन जण दुचाकीवर घेऊन जात असल्याची घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. हा प्रकार सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांना पाहून दोन्ही अनोळखी व्यक्तींनी दुचाकी व भंगार साहित्य जागेवरच सोडून पोबारा केला. याप्रकरणी सुरक्षा अधिकारी सोमेश्वर मधुकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश पालवी करत आहेत.