चाळीसगाव स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणारा तरुण ताब्यात
भुसावळ : चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या भडगाव तालुक्यातील गुढे येथील विकास पाटील नामक तरुणाला आरपीएफ पोलिसांनी सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,पोलिस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर ९ रोजी सुमारे ९.१५ वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला ही माहिती लगेच कळवण्यात आली. त्यानंतर आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्बचा शोध घेतला. तसेच आरपीएफ डॉग स्कॅडने तपासणी केली. या वेळी १ ते ४ पर्यंतचे सर्व प्लॅटफॉर्म तपासण्यात आले आणि तेथे बॉम्ब किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तरी ही याबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना माहितीदेण्यात आली. जळगाव येथील पोलिस पथक आणि आरपीएफ डॉग स्क्वॉड (मनमाड) यांनी त्वरित कारवाई केली आणि ११.२० वाजता संशयिताला पकडण्यात यश आले. मानसिक अस्वस्थ वाटत असलेल्या आरोपी विकास एकनाथ पाटील याने बॉम्ब ठेवल्याचा कॉल केल्याची कबुली दिली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.