ब्रेकिंग : हवालदाराला १० टक्के लाच भोवली, ACB कडून गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । तक्रार अर्जाची चौकशी न करण्यासाठी नमूद रकमेच्या १० टक्के लाच मागणे निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस हवालदार सुरेश पवार यांना चांगलेच भोवले आहे. मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार रुपयांचा केळी माल घेऊन दिल्लीतील व्यापाऱ्यांना विक्री करणारे होते. मात्र त्याबदल्यात त्यांनी शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने संबंधितांनी तक्रारदाराविरोधात लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची चौकशी निंभोरा पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आली होती.
चौकशीदरम्यान हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल होऊ नये यासाठी नमूद रकमेच्या १० टक्के रक्कम पवार यांनी सुरुवातीला लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ ऑक्टोबर रोजी कळवल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात पवार यांनी निंभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्यासाठी २० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
पडताळणीनंतर हवालदार सुरेश पवार यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या पथकातील सहाय्यक फौज. दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, मपोहेकॉ संगीता पवार, पोकॉ राकेश दुसाने, पोकों अमोल सुर्यवंशी, पोकों भूषण पाटील यांनी केली आहे.





