ब्रेकिंग : तिप्पट पैशांचे आमिष, ग्रेड पीएसआय, २ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ जाळ्यात
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी ।जळगाव जिल्हा पोलीस दलासह प्रशासनात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. तिप्पट पैशांचे आमीष दाखवून ग्रामसेवकाला लाखो रुपयात गंडविल्याची माहिती समोर येत असून याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने ग्रेड उपनिरीक्षक, २ पोलीस कर्मचाऱ्यांसह ५ जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकास मच्छिंद्र पाटील वय-३६, शांतीनगर, पाचोरा हे खडकदेवळा येथे ग्रामसेवक आहेत. सचिन धुमाळ रा.जळगाव याच्याशी त्यांची ओळख होती. ओळखीच्या माध्यमातून त्याने त्यांना पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवले होते. तक्रारदाराने त्याच्यावर विश्वास ठेवत १६ लाख रुपये देण्याचे निश्चित केले. तक्रारदार जळगाव शहरात येताच एक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक आणि दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने पैशांची बॅग घेतली आणि शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका हॉटेलला थांबले.
जळगाव एलसीबी निरीक्षक आणि पथकाला याबाबत माहिती मिळताच पथकाने सापळा रचून ५ जणांना ताब्यात घेतले. सर्वांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. गुन्ह्यात आणखी संशयित वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे शहर पोलीस ठाण्यात थांबून असून अधिक तपास सुरू आहे.