आमदार भोळेंवर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करत दिला विजयाचा विश्वास

निवृत्ती, मुक्ताई, बी.जे. नगरात प्रचार रॅलीत स्वागतासाठी लागली रीघ
जळगाव । प्रचारात आघाडी घेतलेले तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश भोळे यांना प्रचारात शहरवासियांकडून भरभरून प्रेमम मिळत आहे. गुरुवारी सायंकाळी प्रेम नगरातील वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात केली. या प्रेमातून शहरवासीयांनी आमदार भोळे यांना विजयाचा विश्वास दिला आहे.
आमदार भोळे यांनी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात मानराज पार्क परिसरातील कार्यकर्ते राहुल पाटील यांचे घरापासून रॅलीला सुरुवात केली. तेथून निवृत्ती नगर, मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, भिकमचंद जैन नगर, भोईटे नगर मार्गे माजी नगरसेविका लताताई भोईटे यांच्या घरी समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींकडून औक्षण करण्यात आले. तर मार्गातील श्री स्वामी समर्थ केंद्र, कार्तिक स्वामी मंदिर अशा विविध मंदिरात उपस्थिती देऊन दर्शन घेतले. रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.