ब्रेकिंग : कोल्हे नगरात गोळीबार?, पोलीस घटनास्थळी दाखल

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरात असलेल्या एका घरात बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी गोळीबार केल्याची घटना समोर येत आहे. घटनास्थळी रामानंद नगर पोलीस पोहचले असून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे नगर परिसरातील १०० फुटी रोडजवळ सपकाळे कुटुंबीय भाड्याने राहतात. त्यांच्याच परिचयातील दोन तरुण रात्री त्या ठिकाणी आले होते. काहीही कारण नसताना रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांनी दारूच्या नशेत घरात गोळीबार केला. रात्रभर याबाबत कुणालाही माहिती नव्हती.
गुरुवारी दुपारच्या सुमारास याबाबत वाच्यता झाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटना घडलेल्या घरी भेट दिली. पोलिसांनी घरातून एक रिकामी पुंगळी हस्तगत केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.