ब्रेकिंग : चिमुकलीचा निर्दयीपणे खून करणारा नराधम जाळ्यात

महा पोलीस न्यूज | २० जून २०२४ | जळगाव जिल्ह्यातील माणूसकीला काळीमा फासणारी घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारात घडली आहे. मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या ६ वर्षीय चिमुकलीची निर्दयीपणे गळा दाबून हत्त्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दरम्यान, पोलिसांनी एका संशयितांची ओळख पटवली असून शोध सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारात काही आदिवासी कुटुंब राहतात. सध्या पेरणीचे दिवस सुरु असल्याने सर्व कुटुंबीय शेतात मोलमजुरीसाठी जातात. ११ जून रोजी एक दांपत्य आपल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून कामानिमित्ताने दुसरीकडे गेले होते. मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत जवळच रहात असलेल्या एका पस्तीस वर्षीय नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला.
दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन नंतर तिला जीवे ठार मारले. पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील सायंकाळी कामावरुन घरी आल्यावर त्यांनी मुलीला घरात पाहिले घरात मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना विचारपूस केली मात्र मुलगी सापडली नाही तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना ही घटना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी मुलुचा सर्वदूर शोध घेतला असता ती मुलगी एका केळीच्या मळ्यात मृत अवस्थेत आढळून आली.
या घटनेनंतर अधिक तपास केला असता याच वस्तीतील सुभाष इमाजी भिल वय ३५ हा तरुण बेपत्ता झाला असल्याचे दिसून आले. तसेच मुलीचा मृतदेह व घटनास्थळ पाहीला असता मयत मुलीवर अत्याचार करुन तीला मारुन टाकले असावे असा अंदाज व्यक्त केला जात होता. आठ दिवस उलटले तरी संशयित आरोपी पोलिसांच्या हाती येत नव्हता. जळगाव जिल्ह्यातील सर्वच पोलीस त्याचा शोध घेत होते.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सुभाष इमाजी भिल हा भुसावळ शहरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. संशयीत सुटून जाऊ नये यासाठी त्यांनी भुसावळ पोलिसांना कळवले आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम रवाना केली. अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या.