एक तासात मोटारसायकल चोरी उघडकीस : उमरखेड डिटेक्शन ब्रँचची कारवाई

एक तासात मोटारसायकल चोरी उघडकीस : उमरखेड डिटेक्शन ब्रँचची कारवाई
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी ओळखला; दोन दुचाकींसह अटक
उमरखेड (प्रतिनिधी) – उमरखेड शहरात एका तासाच्या आत मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात डिटेक्शन ब्रँचच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत दोन चोरट्या दुचाकींसह आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी एकूण ४५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
फिर्यादी रमेश रावजी चव्हाण (वय ६५, रा. जनुना, ह.मु. व्यंकटेश नगर, उमरखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४३३/२०२५ कलम ३०३(२) भा.दं.वि. (BNS) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रँचचे प्रमुख पोउपनि सागर इंगळे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यातून एक संशयित व्यक्ती चोरी केलेली मोटारसायकल घेऊन जाताना दिसून आला. पुढील फुटेजद्वारे हा आरोपी पुसद रोडने जात असल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्हीतील संशयिताची ओळख पटवली असता, त्याचे नाव दत्तात्रय तुकाराम पवार (वय ३५, रा. कल्मुळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे असून, पोलिसांनी तत्काळ त्याच्या घरासमोर छापा टाकून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीकडून हिरो होंडा प्लेन्डर प्रो (क्र. MH-29-AG-4177) – अंदाजे किंमत ₹२०,०००/ आणिहिरो प्लेन्डर (क्र. MH-29-BG-4738) – अंदाजे किंमत ₹२५,०००/-या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, आणि पो.नि. शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर इंगळे, पोहेका मधुकर पवार, पोशि संघशिल टेंभरे, पोशि निवृत्ती महाळनर, आणि पोशि प्रफुल घुसे यांनी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका चंदन जाधव करीत आहेत.