ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात अपक्ष उमेदवारावर गोळीबार!
महा पोलीस न्यूज । दि.५ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघामध्ये प्रचार करीत असलेले अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे.
प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू असताना राजूर गावात पोहचला. विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान, घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून निवडणूक शांततेत पार पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जळगावात जिल्हा पोलीस अधिकारी त्याठिकाणी पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.