ब्रेकिंग : जळगावात तरुणावर गोळीबार? दुचाकींची तोडफोड, दोघे जखमी
महा पोलीस न्यूज । दि.२९ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरातील वाघ नगर स्टॉपजवळ दुचाकीवरुन आलेल्या ६ ते ८ जणांच्या गटाने तरुणावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा अंदाज asun दोन दुचाकींची दगड टाकून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय सीताराम तायडे वय-२६ रा.समता नगर आणि अक्षय सुरेश लोखंडे वय-२१ रा.समता नगर हे दोन तरुण दुचाकी लावून उभे होते. दरम्यान, रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दुचाकीजवळ उभ्या असलेल्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी टोळक्याने तरुणावर गोळीबार केला. यामध्ये अक्षय तायडे या तरुणाच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने तरुण जखमी झाला.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात अक्षय लोखंडे या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून तो जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर टोळक्याने त्या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी तेथील दगड उचलून दुचाकीवर टाकून त्यांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीडी.८६२४ व एमएच.१९.ईडी.८८७९ क्रमांकाच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे.
या घटनमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान, वाद पूर्ववैमनस्यातून झाला असून दुपारी एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर घटना घडून देखील पोलिसांना त्याचा थांगपत्ता देखील नाही. तब्बल तासभराने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पोहचले. रामानंद नगर पोलिसांना घटना माहिती नाही ही धक्कादायक बाब आहे.