ब्रेकिंग : सावदा येथे आग, दोन दुकान जाळून खाक
महा पोलीस न्यूज | ९ एप्रिल २०२४ | सावदा येथे बस स्टॅन्ड जवळील असलेल्या दोन दुकानांना दि.८ रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान अचानक आग लागली यामुळे दुकानातील साहित्य जाळून खाक झाली. आगीत हजारोंचे नुकसान झाले असून आग लवकर आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली आहे.
सावदा येथे बस स्टॅन्डजवळ दुकानांची रांग असून याच रांगेतील प्रथम एका गॅरेजमध्ये दुकान बंद असतांना अचानक आग लागली तेथून धुराचे लोट दिसू लागताच नागरिकांनी तिकडे धाव घेतली. आग वाढल्याने आग शेजारील दुकानात देखील पसरण्यास सुरवात झाली होती परंतु लागलीच सावदा नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले व अखेरीस सुमारे अर्धातासानंतर ही आग विझविण्यात यश आले.
आगीत गॅरेजमधील साहित्य, जुने टायर व इतर वस्तू मिळून हजारो रुपयांचे नुकसान झाले तर शेजारील दुकानाचे देखील ही आग पसरल्याने तिथे देखील नुकसान झाले आहे. त्याठिकाणी एकास एक लागून सुमारे २० ते २२ दुकाने असून ही आग जास्त पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र वेळेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले आहे. आग विझविण्यासाठी सावदा नगर पालिका अग्नीशमनदलाचे अविनाश पाटील व त्यांचे सहकारी तसेच उपस्थित नागरिक यांनी परिश्रम घेतले.