बारदान कंत्राटदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारणारे दोघे जाळ्यात
जळगाव : – एरंडोल येथील शासकीय गोदामातून रिकामे बारदान खरेदी करणा-या कंत्राटदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेणा-या खासगी इसमास एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या लाच प्रकरणी गोदामाच्या अव्वल कारकुनासह लाच स्विकारणा-या खासगी इसमास एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे.
नंदकिशोर रघुनाथ वाघ, वय 47 वर्षे, व्यवसाय नोकरी , गोदाम व्यवस्थापक (अव्वल कारकून ) शासकीय गोदाम, एरंडोल . रा . श्रीराम कॉलनी, बालाजी शाळेच्या मागे, हमजेखान महेमुदखान पठाण , वय 39, धंदा – मुकादम, रा सैय्यद मोहल्ला मारवाडी गल्लीच्या मागे , एरंडोल या दोघांविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदारास शासकीय गोदामातून रिकामे बारदान विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाकडून मिळाले आहे. तक्रारदार यांनी नियमानुसार रिकाम्या बारदानांची एरंडोल येथील गोडावून मधून उचल केल्यानंतर अव्वल कारकुन आणि खासगी इसम या दोघांनी तक्रारदाराची इच्छा नसतांना त्यांना सातशे अतिरिक्त रिकामे बारदान दिले. त्या बदल्यात सुरुवातीला सात हजार रुपयांची मागणी केली. सात हजार रुपये न दिल्यास कंत्राट रद्द करण्यासह भविष्यात कंत्राट मिळू देणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबी कडे तक्रार दिली.
दोघांनी तक्रारदारास दिलेल्या अतिरिक्त बारदानाच्या मोबदल्यात सुरुवातीला सात हजार, नंतर सहा हजार व नंतर 5 हजार 550 रुपयांची लाचेची तडजोड मागणी केली. अखेर पाच हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली. 13 नोव्हेंबर रोजी खासगी इसम तथा कंत्राटदार मुकादम यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले.
अव्वल कारकुनासह खासगी इसमाला ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा परिवेक्षणअधिकारी तथा पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, सापळा व तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे आदींच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकातील पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने आदींनी हि कारवाई केली .