फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक

महा पोलीस न्यूज । दि.८ ऑक्टोबर २०२५ । दरोड्याच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विनोद देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. मंगळवारी, फसवणुकीच्या एका वेगळ्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सध्या ते शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात आहेत.
व्यावसायिक मनोज वाणी यांच्या कार्यालयात दरोडा टाकल्याप्रकरणी २०२३ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात देशमुख यांना २४ सप्टेंबर रोजी अटक झाली होती. पोलिस कोठडीनंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, आता देशमुख यांच्यासह दिनेश शांताराम पाटील, नीलेश शांताराम पाटील, अश्विनी विनोद देशमुख आणि मिलिंद नारायण सोनवणे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात २५ मे २०२३ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातही मनोज लीलाधर वाणी हेच फिर्यादी आहेत.
शहरातील दोन दुकाने विक्रीचा व्यवहार २८ लाख रुपयांत करण्याचे ठरले होते. या व्यवहारापोटी देशमुख दांपत्यासह इतरांनी मनोज वाणी यांच्याकडून वेळोवेळी १४ लाख ५० हजार रुपये घेतले. परंतु, ही दुकाने वाणी यांच्या नावावर खरेदी न करता, ती अश्विनी देशमुख यांच्या नावावर खरेदी करण्यात आली, असा आरोप वाणी यांनी केला आहे. या फसवणुकीच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात आता विनोद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.






