Social

सण, उत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली ‘दशसूत्री’

पोलीस आणि शांतता समिती सदस्यांचे संबंध चांगले राहायला हवे : डॉ.महेश्वर रेड्डी

महा पोलीस न्यूज | ८ एप्रिल २०२४ | समाजात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जमावाला समजावताना शांतता समिती सदस्यांनी शांत राहू नये. सण उत्सव आनंदोत्सव म्हणून साजरा करावा, दुसऱ्यांना दाखविण्यासाठी सण साजरे करू नका, चमकोगिरी करू नका, कोणालाही बळजबरी करू नका, प्रतिक्रियेला उलट प्रतिक्रियेला आपणच जबाबदार आहेत. शांतता भंग करण्याचा हक्क आपल्याला नाही. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे, प्रत्येक झेंडा, बॅनर लावताना परवानगी घ्यावी, धर्म, जात, समाजाच्या नावाने प्रचार प्रसिद्धी करू नये, शासकीय किंवा सार्वजनिक मालमत्तेवर बॅनर लावू नये, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पुढे आयुष प्रसाद म्हणाले की, संयुक्त झेंडे लावल्यास चांगले उदाहरण निर्माण होईल. एकमेकांच्या कार्यक्रमात उपस्थिती द्यायला हवी. सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असून सर्वांनी काळजी घ्यावी. डी.जे.मुळे कुणाचा मृत्यू झाल्यास आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी आपण घ्यावी. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि बालकांची सर्वांनी काळजी घ्यावी. प्रत्येक घटना १० मिनिटात नियंत्रणात आणण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. कोणत्याही अनुचित प्रकारची माहिती कळल्यास पोलिसांना लागलीच कळवावी. शांतता समिती सदस्यांनी आपले मोबाईल शांत न करता समाजात शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

आगामी गुढी पाडवा, रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्री राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि.८ रोजी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पोलीस मंगलम हॉलमध्ये जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, जळगाव मनपा उपायुक्त आदी उपस्थित होते.

तरुणांना समजावून सांगणे आवश्यक : डॉ.महेश्वर रेड्डी

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी, जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक दरवर्षी आयोजित करण्याचे आम्ही ठरवले आहे. सर्व सदस्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपले मुद्दे मांडले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात असलेल्या शांतता समितीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी मार्ग काढला जातो. भविष्यात समिती आणखी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोणत्याही मिरवणुकीचा मार्ग बदलला जाणार आहे. शासनाने दिलेल्या वेळेचे पालन करणे शांतता समिती सदस्यांचे कार्य असून त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. बैठकीला आलेल्या सदस्यांनी मिरवणुकीत प्रत्यक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे. पोलीस आणि शांतता समिती सदस्यांचे संबंध चांगले राहायला हवे. समाजात शांतता राहावी हाच आमचा उद्देश आहे. गुन्हा दाखल झाल्यास भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात हे तरुणांना समजावून सांगणे आवश्यक आहे. डी.जे.चे वाढत चाललेले प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याला एक साऊंड डेसीमीटर देण्यात आले असून अतिरेक झाल्यास कारवाई करण्यात येईल. एकमेकांच्या सणात सहभागी झाल्यास सामजिक सलोखा जपला जाईल. कमीत कमी ४-५ वर्ष काहीच वाद न झाल्यास जिल्ह्याची ओळख संवेदनशील ते शांतताप्रिय अशी होईल. काही घडल्यास सर्व समाजातील लोकांनी आमच्याकडे यावे अशी मानसिकता निर्माण व्हायला हवी. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी केले. तसेच सण उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सर्व बॅनर, फलक काढावे का? असा प्रश्न त्यांनी सर्व सदस्यांना विचारला असता एकमताने होकार आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५ हजार प्रतिबंधात्मक कारवाई, ७० तडीपार, १३ एमपीडीए कारवाया करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविक करताना अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते म्हणाले की, यावर्षी सर्व समाजाचे सण उत्सव एकच महिन्यात आले आहेत. सर्व सण उत्साहात साजरे करावे, कोणतेही गालबोट लागू देऊ नका. तळागाळातील सूचना आणि सल्ले मिळावे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अनेकदा आपण सर्वांनी सामजिक सलोखा दाखवून सण उत्सव शांततेत पार पाडले आहेत, यंदा देखील आपण सर्वांनी तीच भुमिका निभवावी, असे आवाहन नखाते यांनी केले.

चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर म्हणाल्या की, समाजातील ८० टक्के सज्जन प्रवृत्तींनी वाईट प्रवृत्ती विरुद्ध बोलायला सुरुवात केली तर हे सर्व घडणार नाही. समाजातील तुम्ही आमचे कान, नाक, डोळे आहेत. सर्व बैठकींना शांतता समितीच्या बैठकींना हजर राहणे आवश्यक आहे. आज तरुणांचे प्रमाण अधिक असून त्यांना समजावून सांगणे आवश्यक असते. आपण सर्व ज्येष्ठांनी ती जबाबदारी पार पाडावी. मिरवणुकीत महिलांचा सहभाग जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावा. वेळेचे सर्वांनी पालन करा, तरुणांना मार्गदर्शन करा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन नेरकर यांनी केले.

मनपा उपायुक्त म्हणाले, शांतता समिती सदस्य आणि कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांनी कोणतेही बॅनर, झेंडे, व्यासपीठ लावताना नियमानुसार मनपा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी. सध्या आचारसंहिता सुरू असून नियमांचे पालन करावे. पक्ष चिन्ह, पदाधिकारी यांचे बॅनरवर फोटो लावताना आपण परवानगी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले, समाजात असलेल्या सर्व सदस्यांनी एकत्र येवून काही चर्चा केली तर चांगला मार्ग निघतो. सर्व समाजातील प्रथा, विचारांचा एकमेकांनी आदर करावा. सण साजरा करताना जनजागृती करणाऱ्या विषयांना हात घालावा. समाजातील नकारात्मक गोष्टीचा प्रभाव रोखण्यासाठी सकारात्मक बाजू अधिक मांडा, असे अंकित म्हणाले.

आभार प्रदर्शन जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी केले.

बैठकीत मांडलेल्या सूचना
बैठकीत सर्व सदस्यांनी, उन्हामुळे मिरवणुकीला रात्री अर्धा तास वाढीव वेळ मिळावा, मिरवणूक एक दिवस उशिरा काढायची असल्यास परवानगी मिळावी, ईदगाह मैदानाजवळ बॅरेकेटिंग करावे, घोषणाबाजी करणाऱ्यांना आळा घालावा, सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ, पोस्ट टाकणाऱ्यांवर नजर ठेवावी, अशा सूचना मांडण्यात आल्या. रहदारी ठप्प होणार नाही यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, मिरवणुकीत स्वागत मंच उभारण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण दोन दिवस हटविण्यात यावे, अधिकाऱ्यांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे, अशा सूचना मांडल्या.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button