भडगाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय; आमदार खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासनाची स्पष्टीकरणे

भडगाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय; आमदार खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासनाची स्पष्टीकरणे
भडगाव ;-येथील शासकीय हमीभाव (MSP) खरेदी केंद्रावर ज्वारी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या परिस्थितीबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी शासनाला प्रश्न विचारला होता.
यावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की, खरेदी केंद्रावर लाठीमार झाल्याची घटना घडलेली नाही, मात्र नोंदणीसाठी झालेली गर्दी आणि मंडपाचा पाइप कोसळल्यामुळे तीन शेतकरी जखमी झाले होते. जखमी शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आता भडगाव खरेदी केंद्रावर निवार्याची सोय, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, आता उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि शेतकरी सहकारी संघाच्या संयुक्त निर्णयानुसार, ऑनलाइन नोंदणीसाठी स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे. या लिंकची तालुक्यात व्यापक प्रसिद्धी केल्यामुळे आता शेतकरी त्यांच्या मोबाइलद्वारे घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करू शकत आहेत, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






