
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेत अधिक अचूकता आणून आरोपींना न्यायालयातून शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी जळगाव पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून आज एक महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यशाळेत न्यायव्यवस्था, अभियोग पक्ष आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
जळगाव विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या तीन तासांच्या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच सुमारे १०० पोलीस अंमलदार उपस्थित होते.
न्यायव्यवस्थेतील मान्यवरांचे थेट मार्गदर्शन
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेशी थेट संबंधित असलेल्या वरिष्ठ मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीडीजे आर. एन. जोशी, सेशन जज एम. एस. बडे, एस. व्ही. खोंगल, एम. जी. चव्हाण, के. के. चाफळे, डीजीपी काब्रा, चोरडिया तसेच प्रॉसिक्यूशन अॅडिशनल डायरेक्टर श्रीमती ढगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
न्यायाधीश आणि सरकारी वकिलांनी तपासातील कायदेशीर बारकावे, पुरावे सादर करण्याची पद्धत, साक्षीदारांचे जबाब, दोषारोपपत्रातील आवश्यक मुद्दे आणि न्यायालयीन प्रक्रियेत तपासी अधिकाऱ्यांची भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष खटले चालविणाऱ्या मान्यवरांकडून मिळालेल्या अनुभवाधारित सूचना पोलीस अधिकाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या.
दोषारोपपत्रातील त्रुटी दूर करण्यावर भर
अनेक प्रकरणांमध्ये गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे झाला असला तरी किरकोळ तांत्रिक त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे किंवा वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव यामुळे आरोपींना न्यायालयातून लाभ मिळण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन तपास प्रक्रियेत काटेकोरपणा आणणे, प्रत्येक पुरावा कायदेशीरदृष्ट्या सक्षम पद्धतीने संकलित करणे आणि दोषारोपपत्र निर्दोष स्वरूपात न्यायालयात सादर करणे यावर या कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
तसेच घटनास्थळी पुरावे गोळा करताना अनुसरायच्या शास्त्रोक्त पद्धती, डिजिटल आणि वैज्ञानिक पुराव्यांचे महत्त्व, पंचनामा करताना घ्यावयाची काळजी आणि तपासातील मानवी चुका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस आणि अभियोग पक्षातील समन्वय वाढविण्याचा प्रयत्न
कार्यशाळेदरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, केवळ गुन्हा दाखल करणे किंवा आरोपीला अटक करणे हीच पोलिसांची जबाबदारी नसून न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पुरावे सक्षमपणे मांडणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पीडित व्यक्तीला वेळेत आणि योग्य न्याय मिळवून देणे हा पोलीस दलाचा मुख्य उद्देश असून तपासी अधिकारी आणि सरकारी वकील यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाल्यास गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
‘कॉन्व्हिक्शन रेट’ वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
या तीन तासांच्या अभ्यासपूर्ण कार्यशाळेमुळे आगामी काळात जळगाव पोलीस दलाच्या तपास पद्धतीत गुणात्मक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः घटनास्थळी पुरावे संकलन अधिक शास्त्रोक्त आणि कायदेशीर चौकटीत होईल, तपासातील तांत्रिक त्रुटी आणि मानवी चुका कमी होतील, सरकारी वकील आणि तपासी अधिकारी यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण होईल, न्यायालयात खटले अधिक भक्कमपणे मांडले जातील, परिणामी जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
जळगाव पोलीस दलाने घेतलेला हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता न्यायदान प्रक्रियेला अधिक परिणामकारक बनविण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.





