
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरासह जिल्ह्यातील अवैध सट्टा-जुगाराच्या धंद्यांवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर काही काळासाठी बंद झालेला ‘चक्री’ गेम अवघ्या २१ दिवसांत पुन्हा सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. १६ सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने चक्रावर म्हणजेच मशीनच्या माध्यमातून सुरू असलेल्या हायटेक सट्टा अड्ड्यांवर एकाच दिवशी तिहेरी कारवाई केली होती. मात्र, ७ ऑक्टोबरपासून पुन्हा हा खेळ सुरू झाल्याची माहिती समोर येत असल्याने पोलिसांच्या कारवाईनंतरही अवैध धंदे पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, चक्री गेमच्या नादात तरुणाने लाखो रुपये गमावल्याची घटना समोर आल्यानंतर जळगाव शहरातील या प्रकाराकडे पोलिसांचे लक्ष वेधले गेले होते. त्यानंतर झालेल्या कारवाईमुळे हा प्रकार पूर्णपणे बंद झाला असे वाटत असतानाच अवघ्या तीन आठवड्यांत पुन्हा त्याच धंद्याला सुरुवात झाल्याने आता ‘हा खेळ नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू झाला?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
१६ सप्टेंबरला एकाच दिवशी तिहेरी कारवाई
जळगाव शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी शहरातील तीन सट्टा-जुगार अड्ड्यांवर कारवाई केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने एमआयडीसी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्रावर सुरू असलेल्या हायटेक सट्टा अड्ड्यांवर छापे टाकून एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. एकाच दिवशी झालेल्या या तिहेरी कारवाईमुळे सट्टा-जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली होती.
२१ दिवसांत पुन्हा ‘चक्री’चा खेळ?
१६ सप्टेंबरच्या कारवाईनंतर ७ ऑक्टोबरपासून पुन्हा चक्री गेम सुरू झाल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांच्या कारवाईनंतर अवैध धंदे किती दिवस बंद राहतात, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला पोलिसांकडून कारवाई केली जाते, गुन्हे दाखल केले जातात, मुद्देमाल जप्त केला जातो; तर दुसऱ्या बाजूला काही दिवसांतच त्याच प्रकारचे धंदे पुन्हा सुरू होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कारवाईचा धाक आहे की केवळ कारवाईपुरतीच मर्यादा आहे? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
शहरात जुगारही पुन्हा सक्रिय?
चक्री गेमपुरतेच हे चित्र मर्यादित नसल्याचेही बोलले जात आहे. जळगाव उपविभागातील काही भागांत अनेक वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जाणारे जुगाराचे अड्डे पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी सायंकाळच्या सुमारास जुगार सुरू असल्याची माहिती असून, गेल्याच महिन्यात दोन ठिकाणी झालेल्या कारवायांमुळे या चर्चेला काही प्रमाणात दुजोरा मिळत असल्याचे दिसते. अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असताना जर हे धंदे पुन्हा सुरू होत असतील, तर त्यामागे नेमकी यंत्रणा कोणाची आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे.
पालकमंत्र्यांना खोटे ठरवण्याची हिंमत
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाल्याचे सांगितले असताना दुसरीकडे चक्री गेम आणि जुगार पुन्हा सुरू झाल्याच्या चर्चेमुळे प्रशासनासमोरही प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्र्यांना खोटे ठरवण्याची हिंमत कोण करतेय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जर अवैध धंदे खरोखरच बंद झाले असतील, तर २१ दिवसांत पुन्हा चक्री गेम सुरू कसा झाला?
कुणाचा आशिर्वाद, वरदहस्त की आर्थिक लागेबांधे?
जळगाव उपविभागात सुरू झालेल्या चक्री गेममागे कुणाचा वरदहस्त आहे, कुणाचा आशिर्वाद आहे की काही आर्थिक लागेबांधे आहेत या प्रश्नांची उत्तरे जळगावकरांना मिळणे गरजेचे आहे. कारण चक्रीच्या या खेळात पैसा फक्त काही जणांचा फिरत नाही तर अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित आणि तरुणांचे भविष्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ अड्ड्यांवर कारवाई न करता चक्री गेमचे संपूर्ण नेटवर्क, आर्थिक व्यवहार, चालक, मुख्य सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.







