
प्रज्ञाचक्षू दाम्पत्याच्या अंध मुलाला विहिरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप; पती-सासूविरोधात गुन्हा
पीडित सरस्वती पाटील यांचा गंभीर आरोप; राष्ट्रीय दृष्टिहीन संघटनेची जळगावात पत्रकार परिषद
गर्भपातासाठी दबाव टाकल्याचा आरोप; पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह
जळगाव । यावल तालुक्यातील किनगाव शिवारात साडेतीन वर्षांच्या अंध बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने आता गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासूविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडित सरस्वती स्वप्नील पाटील यांच्यासह राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
यावल पोलीस ठाण्यात CR No. 254/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 109(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपींमध्ये स्वप्नील भागवत पाटील (वय ३४) आणि आशाबाई भागवत पाटील (वय ६०) यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. मृत बालकाचे नाव कृष्णा स्वप्नील पाटील (वय ३ वर्षे ६ महिने) असे आहे.
सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद
दिनांक १३ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता किनगाव शिवारातील आरोपींच्या मालकीच्या शेतातील विहिरीत सरस्वती पाटील आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा पडल्याची घटना घडली. या घटनेत सरस्वती जखमी झाल्या, तर मुलगा कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघाती असल्याचे मानून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सरस्वती यांना उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या सुमारे ७५ टक्के दृष्टिहीन असल्याने आणि घटनेनंतर मानसिक धक्क्यात असल्याने त्यांनी सुरुवातीला जबाब दिला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, बालकाचा अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा सरस्वती यांच्याकडे सखोल चौकशी केली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीतून घटनेमागील वेगळीच माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सासूने विहिरीत ढकलल्याचा आरोप
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, घटना घडली त्यावेळी सरस्वती आणि त्यांचे पती स्वप्नील हे शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सासू आशाबाई यांनी सरस्वती आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. विहिरीत पडलेल्या सरस्वती यांनी लाकडी फाउंडेशनचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र, त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेत पती स्वप्नील याचाही सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दोघेही दृष्टिहीन; मुलगाही दृष्टिहीन
या प्रकरणातील आणखी एक संवेदनशील बाब म्हणजे फिर्यादी सरस्वती या सुमारे ७५ टक्के दृष्टिहीन आहेत, तर त्यांचे पती स्वप्नील हे पूर्णपणे दृष्टिहीन असल्याची माहिती देण्यात आली. मृत मुलगा कृष्णा देखील दृष्टिहीन होता. पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांनुसार, गर्भावस्थेदरम्यान गर्भातील बाळाला दृष्टीदोष असल्याचे समजल्यानंतर सासरच्या मंडळींकडून गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आला होता. स्वप्नील हा गर्भपात करण्यास सांगत होता; मात्र सरस्वती यांनी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला.
दोन वर्षे माहेरी; न्यायालयीन प्रक्रियेनंतर सासरी परत
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, सरस्वती आणि स्वप्नील यांचा विवाह २०२२ मध्ये झाला. लग्नानंतर काही काळातच सरस्वती यांना सासरी त्रास होत असल्याने त्या माहेरी परभणी जिल्ह्यात गेल्या होत्या. त्या सुमारे दोन वर्षे माहेरी राहिल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे पुन्हा सासरी नांदण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले. मुलगा कृष्णा याच्याबाबतही सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यात आला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर आरोप
पत्रकार परिषदेत पोलिसांच्या भूमिकेबाबतही गंभीर आरोप करण्यात आले. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तक्रार नोंदवून घेण्याऐवजी सुरुवातीला तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा दावा करण्यात आला. स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली जबाब नोंदवण्यात आल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.टी. धारबळे यांनी आरोपी स्वप्नील याला अटक करण्यास विविध कारणे देत विलंब केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पोलिसांनी आर्थिक व्यवहार केल्याची शंका पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. या आरोपांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
स्वप्नील बँकेत नोकरीला; लग्नासाठी १५ लाखांचा खर्च केल्याचा दावा
पत्रकार परिषदेत सरस्वती यांच्या माहेरच्या मंडळींकडून लग्नासाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा तसेच हुंडा दिल्याचा दावा करण्यात आला. स्वप्नील हा बँकेत नोकरीला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाकडून न्यायाची मागणी
या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिकचे सचिव दत्तू बोडके, विभागीय शाखाध्यक्ष मंगेश शेवाळे, राजेंद्र देवरे आणि राहुल पवार यांची उपस्थिती होती. पीडित सरस्वती पाटील यांना न्याय मिळावा, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत करण्यात आलेल्या आरोपांचीही चौकशी करावी, सासरा आणि नणंद यांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.







