
महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने क्रांतिकारी आहे. या निर्णयामुळे वंचित समाजघटकांना त्यांचा हक्क मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भव्य स्मारकाचे लोकार्पण ना.छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार साहेबराव घोडे, महात्मा फुले स्मारक समितीचे पदाधिकारी, माळी समाजाचे प्रतिनिधी आणि तालुक्यातील फुलेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रसंगी सांगितले की, योग्य नेतृत्व, ठोस भूमिका आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. हे स्मारक केवळ इतिहासाचा सन्मान करणारे नसून, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. तरुणांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करावेत आणि व्यसनमुक्त राहून देशाला महाशक्ती बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, या स्मारकासाठी १ कोटी ऐवजी २ कोटींचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली, ज्याचा पाठपुरावा आमदार मंगेश चव्हाण यांनी अवघ्या ४८ तासांत पूर्ण करून निधी मंजुरीचा शासन निर्णय प्राप्त केला.
मंत्री छगन भुजबळ यांनी स्मारकाच्या सुंदर निर्मितीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक केले आणि स्मारकाच्या स्वच्छतेची जबाबदारी सर्व समाजाने घ्यावी, असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाज परिवर्तनाचे आहे. या स्मारकामुळे त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचतील.”
आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मारक उभारणीचा प्रवास सांगताना समाजात द्वेष पसरवणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, “जात-पात पलीकडे जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. फुले दांपत्याने दाखवलेल्या शिक्षणाच्या वाटेवर चालत, माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन तिला क्लस्टर मॉडेल स्कूल बनवण्याचा माझा मानस आहे.” त्यांनी स्मारकाच्या कामासाठी रात्रंदिवस पाठपुरावा करून अवघ्या १० महिन्यांत चाळीसगावातील अंधशाळा चौकात हे भव्य स्मारक पूर्ण केले.
विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, चाळीसगावसारख्या शैक्षणिक परंपरेच्या शहरात फुले दांपत्याचे स्मारक उभारले जाणे ही अभिमानाची बाब आहे. गेल्या ५० वर्षांपासूनची समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमात उद्धवराव महाजन, डॉ.संजय माळी, सचिन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक दिनेश महाजन यांनी केले. स्मारकाच्या या थाटामाटात झालेल्या लोकार्पण सोहळ्याने चाळीसगावात सामाजिक एकतेचा आणि प्रेरणेचा संदेश दिला.






