ब्रेकिंग : जळगाव जिल्हावासियांनो सावधान, आकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अणुऊर्जा विभाग यांच्या संशोधन मोहिमेअंतर्गत हैदराबाद येथून उच्च उंचीवर जाणाऱ्या वैज्ञानिक बलून उड्डाणांची मालिका राबविण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण सुमारे १० उड्डाणे करण्यात येतील. हे प्रयोग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैदराबाद येथील बलून सुविधा केंद्रातून केले जाणार आहेत.
मोहिमेत वापरण्यात येणाऱ्या बलूनचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असून, त्यात हायड्रोजन वायू भरला जातो. बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर जातात आणि त्यांच्याद्वारे विविध वैज्ञानिक उपकरणांची माहिती संकलित केली जाते. प्रयोग संपल्यानंतर ही उपकरणे रंगीत पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरवली जातात.
वाऱ्याच्या दिशेनुसार उपकरणे हैदराबादपासून २०० ते ३५० किलोमीटर अंतरावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगाव सह छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत उपकरणे उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी सूचना :
• जर एखादे पॅराशूट किंवा उपकरण आढळले, तर त्याला स्पर्श, हालचाल किंवा उघडण्याचा प्रयत्न करू नये.
• काही उपकरणांमध्ये उच्च दाबाची विद्युत प्रवाह प्रणाली असू शकते.
• वैज्ञानिक माहिती नष्ट होऊ नये, यासाठी उपकरणे जशी आहेत तशीच ठेवावीत.
अशी वस्तू आढळल्यास :
• जवळच्या पोलिस स्टेशन, जिल्हा प्रशासन किंवा पोस्ट ऑफिस येथे लगेच कळवावे.
• तसेच TIFR बलून सुविधा केंद्र, ईसीआयएल, हैदराबाद येथे संपर्क साधण्याचेही आवाहन आहे.
..तर नागरिकांना मिळणार बक्षीस
उपकरणांची सुरक्षित परतफेड करणाऱ्या नागरिकांना बक्षीस आणि खर्चाची भरपाई देण्यात येईल. मात्र, उपकरणे खराब किंवा छेडछाड झाल्यास बक्षीस दिले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. गावपातळीपर्यंत ही माहिती पोहोचवून जनजागृती करावी, अशा सूचना संबंधित विभागांकडून देण्यात आल्या आहेत.






