चाळीसगावच्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल, पोलीस अधीक्षक म्हणाले..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेतील पोलीस कर्मचारी योगेश बेलदार यांच्यावर अवैध धंदेवाल्यांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. सोशल मीडियात एका व्यक्तीसोबत मद्यपान करतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून पोलीस दलाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणार आहेत.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेतील पोलीस कर्मचारी योगेश बेलदार गेल्या अनेक वर्षापासून चाळीसगाव तालुक्यातच विविध ठिकाणी कार्यरत आहेत. चाळीसगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये बसून मद्यपान करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून सोबत बसलेला व्यक्ती अवैध धंद्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील विविध घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. अवैध धंदे चालवणाऱ्यांशी संबंधित असल्याचा आरोप बेलदार यांच्यावर वारंवार होत असून, यापूर्वीही ते वादात सापडले होते. त्या प्रकरणानंतर त्यांची बदली मुख्यालयात करण्यात आली होती.
दरम्यान, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून व समाजघटकांकडून होत आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमभंगाला प्रोत्साहन देणे गंभीर बाब मानली जात आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी तीव्र होत आहे.






