ब्रेकिंग : पश्चिम बंगालच्या विवाहितेचा जळगावात पोलिसाकडून शारीरिक छळ

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पश्चिम बंगालमधील ३१ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून जळगाव पोलिस दलातील कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे (वय ३२) याने २०२१ ते २०२५ या कालावधीत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, नितीन सपकाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेसबूकवरून मैत्री ते फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आणि नितीन सपकाळे यांची ओळख २०१८ मध्ये फेसबूकद्वारे झाली. तेव्हा पीडिता तिच्या पतीसोबत कौटुंबिक वादामुळे विभक्त राहत होती. फेसबूकवरील चॅटिंग आणि कॉलमधून दोघांमध्ये मैत्री झाली. नितीनने स्वत: अविवाहित असल्याचे सांगत पीडितेला लग्नाचे आणि संसार थाटण्याचे आश्वासन दिले. त्याच्या आग्रहामुळे २८ जानेवारी २०२१ रोजी पीडिता कामानिमित्त जळगावात आली. ती आपल्या मैत्रिणीच्या घरी जाणार होती, मात्र मैत्रीण घरी नसल्याने ती रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये थांबली.
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण
नितीनने पीडितेला हॉटेलमध्ये भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. त्यानंतर ३० जानेवारी २०२१ रोजी नितीनने पीडितेला बळजबरीने दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले आणि तिथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. २०२१ ते २०२४ या कालावधीत त्याने वेळोवेळी जळगावातील विविध हॉटेलांमध्ये पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान, पीडितेने नितीनच्या मोबाइलमध्ये त्याचे लग्न झाल्याचे पुरावे पाहिले. तिने जाब विचारला असता, त्याने पत्नीपासून घटस्फोट घेण्याचे आश्वासन दिले.
घटस्फोटाचे खोटे आश्वासन आणि मंदिरात लग्न
२०२४ ते २०२५ या कालावधीतही नितीनने घटस्फोटाचे खोटे आश्वासन देऊन पीडितेशी शारीरिक संबंध ठेवत राहिला. ५ मे २०२५ रोजी त्याने पीडितेला पुन्हा जळगावात बोलावून हायवेजवळील हॉटेलमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी पीडितेने नितीनच्या मोबाइलमध्ये त्याच्या कुटुंबासहचे नवीन फोटो पाहिल्याने पुन्हा वाद झाला. नितीनच्या पत्नीनेही पीडितेशी संपर्क साधून पैसे देण्याची ऑफर दिली, तसेच तिचे नितीनसोबत लग्न करून सोबत राहण्याची तयारी दाखवली. काही लोकांच्या मदतीने पीडितेची कागदपत्रांवर सही घेत मंदिरात लग्न करण्यात आले. मात्र, त्यानंतरही नितीनने एकत्र राहण्यास नकार दिला.
मानसिक धक्का, तक्रार दाखल
या सगळ्या प्रकारामुळे पीडितेला प्रचंड मानसिक धक्का बसला. ती कोलकाताला परतली आणि कुटुंबीय तसेच मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून अखेर जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नितीन सपकाळे याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, फसवणूक आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






