शाळकरी मुलीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण, शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । दि.१४ ऑगस्ट २०२५ । शहरातील एका ११ वर्षीय विद्यार्थिनीचा तिच्या इच्छेविरुद्ध फोटो काढल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षीय मुलगी ही दि.६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान तिच्या क्लासला जात होती. त्यावेळी चौकात विपुल मोहन शंखपाळ (रा.वाल्मीक नगर, जळगाव) या तरुणाने आपल्या मोटारसायकलवरून येऊन मोबाईलमध्ये तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले. मुलगी पुढे निघून गेल्यानंतरही तो पुन्हा दुसऱ्या गल्लीतून समोर येऊन तिचे फोटो काढत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मुलीने घरी दिल्यानंतर, तिचे वडील आणि भाऊ यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजमध्ये विपुल शंखपाळ हा मुलीचे फोटो काढत असल्याचे स्पष्ट दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज आणि मुलीच्या ओळखीवरून खात्री पटल्यावर तिच्या पालकांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात विपुल शंखपाळविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहे.






