बाहेरगावी जातांना सर्तकता बाळगण्याची गरज ; जळगाव जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

बाहेरगावी जातांना सर्तकता बाळगण्याची गरज ; जळगाव जिल्हा पोलीस दलाचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी दिवाळीच्या सुट्टीत अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांकडे परगावी जातात, अशावेळी घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरटे घरफोडी करुन घरातील मौल्यवान ऐवजावर हात साफ करतात. विशेष म्हणजे दिवाळी सणाच्या कालावधीत चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेऊन सतर्कता बाळगणे गरजेच आहे. दिवाळीच्या काळात नोकरवर्ग घराला कुलूप लाऊन आपापल्या गावाकडे जातात, तर बाजारात विविध वस्तुंच्या खरेदीसाठी महिला वर्ग बाहेर पडतात.
या गर्दीचा व संधीचा फायदा घेऊन बाजारात चैन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टिंग, मोबाइल चोरीसह फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, त्यामळे नागरिकांनी घरामध्ये रोख रक्कम न ठेवता सोने चांदीचे दागीने सुरक्षिततेसाठी बँक लॉकर मध्ये ठेवावेत. बाहेरगावी जात असल्यास आपल्या घराचे दरवाजे खिडक्या व्यवस्थित बंद करावेत, बाहेरगावी जात असल्याबाबत आपल्या शेजारी तसेच संबंधीत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महिलांनी दिवाळी सण उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेत वावरतांना आपल्या मौल्यवान वस्तू दाग दागिने, पर्स, मोबाइलसारख्या वस्तू कशा सुरक्षित राहतील यावर भर द्यावा, महिलांनी बाजारात व ईतर ठिकाणी घराबाहेर जातांना त्यांनी परीधान केलेल्या दागिने हे व्यवस्थीत झाकलेले असावेत, शक्यतो मॉर्निंग वॉकला जातांना दागिने परिधान करु नयेत, तसेच एकटे जाणे टाळावे.असे आवाहन ळगाव जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.






