Crime

९०० रुपयांच्या वादातून चिमुकल्याने गमावले प्राण !

दांडक्याचा वार चुकवताना निष्पाप बालकाला बसला फटका; आरोपीला  अटक

९०० रुपयांच्या वादातून चिमुकल्याने गमावले प्राण !
दांडक्याचा वार चुकवताना निष्पाप बालकाला बसला फटका; आरोपीला  अटक
जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारातील दुर्दैवी घटना

जळगाव, प्रतिनिधी : दोन व्यक्तींमधील किरकोळ आर्थिक वादाचे पर्यवसान एका निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूत झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात शुक्रवारी घडली. दांडक्याचा वार चुकविण्याच्या प्रयत्नात तो सहा वर्षीय मुलाला लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत मुलाचे नाव वंश सुनील बारेला (वय ६, रा. उनपदेव, ता. चोपडा) असे आहे. या प्रकरणी मच्छिंद्र रमण पाटील (वय ३२, रा. आव्हाने) याला जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडील लाकडी दांडकाही जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाने शिवारातील म्हशींच्या गोठ्याच्या देखभालीसाठी बारेला कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहे. या गोठ्यात काम करणारा भावेश धनगर याच्याकडे आरोपी मच्छिंद्र पाटील याचे ९०० रुपये येणे होते. याच पैशांच्या कारणावरून शुक्रवारी दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढल्यानंतर आरोपीने भावेश धनगर याच्यावर लाकडी दांडक्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भावेशने तो वार चुकविला. त्याचवेळी जवळच उभा राहून हा वाद पाहत असलेल्या वंश बारेला याला दांडका लागला. गंभीर जखमी झालेल्या वंशला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. या घटनेमुळे आव्हाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, क्षुल्लक वादातून एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button