
मंदिरातील चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद
भडगाव पोलिसांची कारवाई
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात भडगाव पोलिसांना यश आले असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ३.०० ते ४.३० वाजेदरम्यान कजगाव येथे रेल्वे पुलाजवळील महादेव मंदिरातून १५,००० रुपये किमतीचे पंचधातूचे वस्त्र, ५,००० रुपये किमतीचा पंचधातूचा नाग आणि ५,००० रुपये किमतीचे पंचधातूचे त्रिशूल असा एकूण २५,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच, दि. २० मार्च २०२५ रोजी रात्री ११.०० ते दि. २१ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजेदरम्यान कजगावच्या भास्कर नगरातील महादेव मंदिरातून ५,००० रुपये रोख आणि ३,००० रुपये किमतीचा एम्प्लिफायर असा एकूण ८,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याबाबतही भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले.
गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी (रा. कजगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्या साथीदार मिथुनसिंग मायासिंग बावरी (रा. कजगाव) याच्या सहभागाची माहिती दिली. त्यानंतर मिथुनसिंगला देखील अटक करण्यात आली.
आरोपींकडून चोरीला गेलेल्या रोख रकमेपैकी ३,००० रुपये आणि ३,००० रुपये किमतीचा एम्प्लिफायर हस्तगत करण्यात आला आहे. तसेच, पंचधातूचे वस्त्र, नाग आणि त्रिशूल यांची विक्री केल्याची माहिती आरोपींनी दिली असून, त्याचा पुढील शोध सुरू आहे.