मोठी कारवाई : गिरणा पात्रातून वाळू चोरी करणारे आठ ट्रॅक्टर जप्त
मध्यरात्री भडगाव पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई

महा पोलीस न्यूज । भडगाव । सागर महाजन । भडगाव शहरासह तालुक्यात गिरणा नदी पात्रातून वाळू वाहतूक बेसुमार सुरू आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी घोडदे येथे वाळू माफियांकडून तलाठ्यांना मारहाणीचा प्रकार घडला होता. याबाबत काल मध्यरात्री भडगाव पोलीस व महसूल विभाग यांनी संयुक्तिक कारवाई करत तब्बल आठ अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त केले आहेत.
कारवाईत पाचोरा येथील सात ट्रॅक्टर व भडगाव येथील एक ट्रॅक्टर असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी सांगितले.
संपूर्ण कारवाई भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पो.ना.मनोहर पाटील, पो.कॉ.महेंद्र चव्हाण, पो.कॉ.प्रविण परदेशी, होमगार्ड किशोर पाटील, संजय परदेशी, विनोद जाधव, तसेच महसूल पथकातील ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, ग्राम महसूल सेवक अमोल पाटील, विशाल सुर्यवंशी, समाधान माळी आदींनी मध्यरात्री कारवाई केली आहे. या सर्व अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.