
क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक
आरोपीला अटक ,सायबर पोलिसांची कारवाई
नाशिक प्रतिनिधी
सायबर गुन्ह्यांचा वाढता विळखा आणखी एकदा समोर आला आहे. सिन्नर तालुक्यातील एका व्यापाऱ्याला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ६४ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून आरोपीला नाशिक शहरातून अटक केली असून फिर्यादीस दोन लाख दोन हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर येथील व्यापाऱ्याशी अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला आणि “https://trustincoin.com” या वेबसाइटवर USDT (Crypto Currency) मध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. पुढे त्याला एका ग्रुपमध्ये सामील करून Binance नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. विश्वास संपादन करून सायबर भामट्यांनी विविध बँक खात्यांवरून पैसे हस्तांतरित करून एकूण ६४ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केली.
या प्रकरणी नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०७/२०२५ भा.दं.वि. कलम ४१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक मा. बाळासाहेब पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक मा. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, हवालदार सुवर्णा आहिरे, सुनिल धोक्रट, आकाश अंवोरे, हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी संयुक्तपणे तपास करत आरोपी अमेय अरविंद जैन (वय २९, रा. अत्रेय राजराजेश्वरी, काळे नगर, नाशिक) यास अटक करण्यात यश मिळवले. तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादीचे दोन लाख दोन हजार रुपये परत मिळवून दिले.
नागरिकांना सायबर पोलिसांचे आवाहन
नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या फोन कॉल्स, लिंक किंवा गुंतवणुकीच्या संदेशांवर कधीही विश्वास ठेवू नये. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती फोनवरून मागत नाही. त्यामुळे अशा फसव्या लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला, सायबर पोलिस स्टेशनला, किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३०, १९४५, १४४०७ वर संपर्क साधावा. तसेच नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांचे क्रमांक ०२५३-२२२०४०८ / ७६६६३१२११२ वरही तक्रार नोंदवता येईल






