चित्रपटाला आले आणि दाम्पत्याला झाला मनस्ताप

महा पोलीस न्यूज | १६ मार्च २०२४ | आपल्या कुटुंबासोबत काही मनोरंजनाचे क्षण घालविण्यासाठी लोक चित्रपट किंवा फिरण्याचा प्लॅन करतात. जळगाव शहरात तसे काही फारसे ठिकाण नाही मात्र चित्रपट हाच बरा मार्ग आहे. शुक्रवारी रात्री आयनॉक्स थिएटरमधून चित्रपट पाहून आनंदाने बाहेर पडलेल्या दाम्पत्याच्या आनंदावर काही क्षणात विरजण पडले. काही टवाळखोरांनी त्यांच्या चारचाकीला ओरखडे पाडले आणि अश्लील शब्द लिहिले. अगोदरच मनस्ताप कमी होता की काय त्यात तिथल्या सुरक्षारक्षक आणि संबंधितांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले.
जळगावातील कोल्हेनगर परिसरात राहणारे निखील दीपक अग्रवाल हे पत्नी रोशनीसह खान्देश सेंट्रल परिसरातील आयनॉक्स थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. सायंकाळी ७.१५ च्या सुमारास त्यांनी स्वतःची चारचाकी क्रमांक एमएच.१९.ईजी.२३५५ ही पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री १०.१५ वाजता ते चित्रपट पाहून बाहेर आले असता आपल्या चारचाकीकडे पोहचल्यावर त्यांना धक्काच पोहचला. काही अज्ञात टवाळखोरांनी त्यांच्या चारचाकीच्या चहूबाजूने अणुकुचीदार वस्तूने ओरखडे पाडले होते.
केवळ ओरखडे नव्हे तर अश्लील शब्द आणि शिवीगाळ लिहिलेली होती. घडलेल्या प्रकाराबाबत निखील यांनी त्याठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांना कळविले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली जबाबदारी झटकत त्यांनी आयनॉक्स प्रशासनाकडे बोट दाखविले. कुणीही सहकार्य न करता सर्व एकमेकांकडे बोट दाखवत होते. अगोदरच नुकसान आणि त्यात मनस्ताप वाढत असल्याने अखेर अग्रवाल दांपत्याने शहर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.