समाजातील नीच प्रवृत्ती : प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची समाजमाध्यमात बदनामी, गुन्हा दाखल
महा पोलीस न्यूज । दि.१० ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरात समाजात काही नीच प्रवृत्तीचे लोक सक्रिय झाले असून प्रतिष्ठित नागरिकांच्या बदनामीचा विडा त्यांनी उचलला आहे. एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाच्या नावाने समाज माध्यमात आणि पत्रके छापून बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी येथे असलेल्या हॉटेल फॉर सीजन रिक्रिएशनचे मालक महेश पूरनमल प्यारप्यानी यांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची बदनामी व्हावी या उद्देशाने काही समाजकंटकांनी आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांनी पोस्ट आणि पत्रके व्हायरल केली आहे. कोणताही वाद किंवा चुकीचा प्रकार नसताना हे उद्योग करण्यात आले आहेत.
जळगाव शहरातील सिंधी समाजाच्या लोकांच्या मोबाईलवर ग्रुप कोणीतरी अज्ञात इसमाने दि.६ रोजी एमआयडीसी जळगाव येथे असलेल्या हॉटेल फॉर सीजन क्रिएशनच्या बाबतीत तसेच हॉटेल फॉर सीजनचे मालक महेश पूरनमल प्यारप्यानी यांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची बदनामी व्हावी अशा प्रकारचे खोटे व लबाडी प्रकाराच्या बदनामी कारक मजकूर असलेले मेसेज व तशीच पत्रके जळगाव शहरांमध्ये असलेल्या सिंधी समाजाच्या इसमांच्या दुकानांमध्ये टाकले होते.
एमआयडीसी पोलिसांसमोर मोठे आव्हान
महेश प्यारप्यानी यांना याबाबत माहिती मिळाल्यावर व सदर पत्रके वाचून त्यात त्यांची बदनामी होत असल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, आज महेश प्यारप्यानी यांच्या बाबतीत घडलेल्या प्रकार उद्या कुणाच्याही बाबतीत घडू शकतो. समाजात अचानक वर आलेली नीच प्रवृत्ती वेळीच ठेचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. एमआयडीसी पोलीस संशयितांचा वेळीच शोध घेतील अशी अपेक्षा आहे.
‘या’ प्रवृत्तीला वेळीच रोखणे गरजेचे : महेश प्यारपानी
हॉटेल फॉर सीजन रिक्रिएशनच्या माध्यमातून आम्ही कमी वेळेत चांगले नावलौकिक मिळवले आहे. समाजात आमची चांगली प्रतिष्ठा असून सर्वांशी चांगले संबंध आहेत. काही लोकांनी हेतूपुरस्कररित्या बदनामी करण्याच्या उद्देशाने किंवा खंडणी उकळण्याच्या इराद्याने हा प्रकार केला आहे. समाजातील अशा प्रवृत्तीला रोखणे गरजेचे असून त्यामुळे कुणीही आयुष्यातून उध्वस्त होऊ शकतो. पोलीस लवकरच आरोपीला शोधतील असा मला विश्वास असल्याचे हॉटेल फॉर सीजन रिक्रिएशन मालक महेश प्यारपानी यांनी सांगितले.