खानदेश नाट्य प्रतिष्ठानचा कौटुंबिक सोहळा उत्साहात संपन्न

खानदेश नाट्य प्रतिष्ठानचा कौटुंबिक सोहळा उत्साहात संपन्न
७० कलावंतांचा सन्मान; नाट्यवेड्यांच्या आठवणींना उजाळा
जळगाव : गुरुपौर्णिमेनिमित्त खानदेश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव तर्फे आयोजित कौटुंबिक स्नेहमेळावा व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात जुन्या आणि नव्या अशा एकूण ७० रंगकर्म्यांचे एकत्रीकरण झाले. अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या कलावंतांनी गळाभेट घेत जुना काळ आठवला आणि अविस्मरणीय क्षण अनुभवले.
या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून योगदान देणाऱ्या जेष्ठ रंगकर्म्यांचा सत्कार नाट्य समीक्षक प्रा. राजेंद्र देशमुख, जय भवानी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भानुदास पाटील, सचिव बाळकृष्ण पाटील, सहसचिव रविराज पगार आणि महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आला.
सन्मानित कलावंतांमध्ये उत्तमराव नेरकर, प्रमोद बाविस्कर, सुनंदा गवळी, अरुण सानप, संतोष पाटील, रविंद्र साळी, सोमनाथ सानप, अविनाश चव्हाण, योगेश शुक्ल, श्याम जगताप, संजय निकुंभ, दुष्यंत जोशी, पियुषभाई रावल, सोनल कपोते, चंद्रकांत चौधरी, मिलिंद देशमुख, अरुण साळुंखे, ओमप्रकाश शर्मा आणि रवी पाटील यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना योगेश शुक्ल यांनी खानदेश नाट्य प्रतिष्ठानच्या वाटचालीचा इतिहास व आठवणी सांगून भावनिक वातावरण निर्माण केले. प्रमुख पाहुणे रविराज पगार यांनी “एका विचाराचे पाच जण एकत्र आले तर काय घडू शकते” याचे उदाहरण देत रंगकर्मींमध्ये ऊर्जा निर्माण केली.
प्रा. राजेंद्र देशमुख यांनी नाटक या प्रभावी माध्यमाच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकत रंगभूमीवरील कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमात पुढील महत्त्वाच्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. खानदेश नाट्य प्रतिष्ठानचा सुवर्ण महोत्सव १६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा होणार असून, त्यानिमित्त चिंतामण पाटील यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘स्मरणिका’ तयार केली जाणार असून, रंगकर्म्यांनी आपले लेख १ ऑगस्टपर्यंत योगेश शुक्ल यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन शरद भालेराव यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार अरुण सानप यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश सोनार, प्रदीप जाधव आणि कु. एकता आसोदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.