Detection Story : वयोवृद्ध शेतकरी दांपत्याला सुरा लावत बकऱ्या चोरी, एलसीबीने शिताफीने पकडली गँग
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात बकऱ्या चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. चाळीसगाव हद्दीतील भवाळी गावात वृद्ध शेतकरी दांपत्याला धारदार चाकूचा धाक दाखवत १९ बोकड व ७ बकऱ्या एका गँगने चोरून नेल्या होत्या. एलसीबीच्या पथकाने शिताफीने शोध घेत एक गँग पकडली असून रडकुंडीला आलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या चेहऱ्याचे हसू परत केले आहे. आपला मुद्देमाल परत मिळताच दांपत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.
एखाद्या गरीब शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील पशुधन चोरी झाले तर त्याची अवस्था फार बिकट होत असते. जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पशुधन चोरीचे गुन्हे वाढले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावात एक शेतकरी दांपत्याने शेडमध्ये १९ बोकड व ७ बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात रात्रीच्या सुमारास काही तरुण त्याठिकाणी आले. पाणी मागण्याच्या बहाण्याने प्रवेश करीत त्यांनी दांपत्याच्या गळ्याला सुरा लावला. जीवे मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी चारचाकी वाहनात सर्व पशूधन घेत पोबारा केला.
चोरट्यांच्या शोधार्थ एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील अधिकारी व अमंलदार यांना तांत्रिक व गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे.ला दाखल गुन्हा चेतन गायकवाड याने त्याचे साथीदारासह केला असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे पथक दोन दिवसापासून भवाळी ता.चाळीसगाव भागात पाळत ठेवून होते. दि.३ ऑक्टोबर रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की, चेतन गायकवाड व त्याचे साथीदार गावात आले आहेत. पथकाने सापळा रचून चेतन गायकवाड व त्याचे साथीदार यांना ताब्यात घेतले.
मजुरी करताना रचला चोरीचा डाव
चौकशीत चेतन गायकवाड याने सांगितले की, त्याने व त्याच्यासोबत असलेले गोरख फकीरा गायकवाड, बबलु आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड व शंकर मोरे सर्व रा भवाळी ता चाळीसगांव अशांनी मजुरी व्यवसाय निमीत्त ते हिंगोणे परीसरात जात होते. तेव्हा तेथे त्यांनी एका शेतामध्ये पत्र्याच्या शेड मध्ये बकऱ्या असल्याची माहीती होती. म्हणुन त्या सर्वांनी मिळुन चारचाकी वाहनाने व मोटार सायकलने सदर ठिकाणी जावून तेथे खाटीवर झोपलेल्या इसमास धारदार शस्त्राचा धाक दाखवून शेड मधील १९ बोकड व ७ बकऱ्या त्यांनी सोबत आणलेल्या चार चाकी वाहनाने व मोटार सायकलने घेवुन जावुन विक्री केल्या.
पैशाची केली वाटणी, शेतकऱ्याच्या डोळ्यात आले पाणी
बकऱ्या आणि बोकड विक्रीतुन आलेली रक्कम सर्वांनी वाटणी केली. पोलिसांनी ५ आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ लाख ९ हजार रोख व २६ हजाराची गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर आरोपी गोकुळ गायकवाड व शंकर मोरे यांना चाहुल लागल्याने ते पळुन गेले असून पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहेत. सर्व पशुधन शेतकऱ्याने परत घेतले असून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले आहेत.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनिरी गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, हवालदार संदिप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दिपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.